भयंकर! कुत्रा, मांजर, चिमणीलाही कोरोना, आता मनुष्याचे काय?

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : कोरोना विषाणू आणि त्यापासून होणाऱ्या कोवीड-१९ या आजाराने सगळे जग चिंतेत आहे. हा विषाणू मनुष्यात कुठून आला, हे अद्यापही कळले नाही. या विषाणूविरुद्ध सबंध मानव जातीचे युद्ध सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत मनुष्याला हे युद्ध जिंकावेच लागणार आहे. पण, या विषाणूपासून केवळ मनुष्यालाच धोका आहे असे नाही; तर वाघ, कुत्रा आणि मांजरीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. एवढेच नाही तर कायम आपल्या अवती-भोवती चिवचिवाट करणारी चिमणीसुद्धा यापासून सुरक्षित नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे मनुष्याच्या चिंतेत भर पडली आहे. जर या बाधित पशू-पक्ष्यांच्या संपर्कात मनुष्य आला तर काय होईल, या बाबत  eSakal.com ने तज्ज्ञाकडून जाणून घेतलेली खास माहिती...

कुठे काय झाले? 

हॉंगकॉंगमधील एका बाधित व्यक्तीच्या घरातील दोन पाळीव कुत्रे, बेल्जियममध्ये एक मांजर आणि अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील ब्रान्क्स प्राणिसंग्रहालयामधील वाघाला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे वन्य प्राण्यांसह गाय, म्हैस, बैल, कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. कुठल्याही प्राण्यांना कोरोना होऊ नये, यासाठी वनमंत्रालयाने प्राणिसंग्रालयाला सूचना आणि निर्देश दिले आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणानेही याची दखल घेत देशातील सर्व प्राणिसंग्रहालयांना हाय अ‍लर्ट जाहीर केला आहे. एवढेच नाही कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील चिमणीलासुद्धा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असा दावा पशुवैद्यकीय डॉक्टरांनी केला आहे.

या प्राण्यांना अधिक धोका

पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले की, प्राण्यांमध्ये माणसांप्रमाणेच कोरोनाची लक्षणे आढळण्याची शक्‍यता आहे. यात प्रामुख्याने कोरडा खोकला आणि ताप ही लक्षणे असू शकतात. वाघाबरोबर प्राणिसंग्रहालयातील बिबट्या, सिंह, खवले मांजर, भटकी कुत्री, पाळीव मांजर आणि पेट हाऊस मधल्या फेरेट आणि  भारतभर वन्य अधिवासांमधे आढळणारे मुस्टेलिडी कुळातील चांदी अस्वल, पाण-मांजर, विजल, मार्टिन या प्राण्यांवरही कोरोना संसर्ग होऊ शकतो.  त्याचबरोबर माकड प्रजातीतील प्राण्यांनाही धोका आहे.

प्राण्यांपासून मनुष्याला लागण होते का?

परदेशात कोरोना बाधित मनुष्याच्या संपर्कात आल्याने कुत्रा, मांजर आणि वाघ कोरोनाग्रस्त झाल्याचे समोर आले. पण, या बाधित प्राण्यांपासून त्यांच्या संपर्कात असलेला, त्यांची काळजी घेणारा कुणी मनुष्य बाधित झाल्याचे आढळले नाही, असे चंदीगडमधील शासतकीय वेटरनरी रुग्णालयाचे प्रमुख तथा प्रसिद्ध पशुचिकित्सक डॉ. अश्विनी कुमार यांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे प्राण्याला कोवीड-१९ झाला तरी घाबरण्याचे कारण नाही.

मांजर आपोआप होते बरी

आपल्या पाळीव प्राण्याला कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्याचा सल्लाही डॉ. अश्विनी कुमार यांनी दिला. ज्या भागात कोरोनाचा रुग्ण आढळला त्या भागात आपल्या प्राण्याला जाऊ देऊ नका. तो बाहेर काही खात तर नाही ना, यावरही विशेष लक्ष ठेवा, घराला, प्राण्याला स्वच्छ ठेवा. पाळीव कुत्रा, मांजर बाहेरून आले तर त्यांना तत्काळ बीटाडीन, अल्कोहलने स्वच्छ करून घ्या. जर तुमचा पाळीव कुत्रा सुस्त पडलेला दिसला, त्याने अचानक खाणे बंद केले, त्याला श्वास घेण्यास अडचण येत असेल तर ही कोरोनाची प्राथमिक लक्षणे आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पण या उलट मांजरीला कोरोनाचा संसर्ग झाला तर घाबरण्याचे कारण नाही. कारण तिच्या शरीरात असलेल्या विशिष्टय सेल्समुळे तिच्या फुफ्फसापर्यंत हा संसर्ग जात नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेली मांजर दोन आठवड्यात आपोआप बरी होते, अशी माहिती डॉ. अश्विनी कुमार यांनी दिली.

कोरोना व्हायरस नेमका कुठून आला, हेच अद्याप  ठोस कळले नाही. एखाद्या पशू-पक्ष्यांपासून तो आला असावा, असा अंदाज बांधल्या जात आहे. त्याचा स्रोत कळला तर मनुष्याला कोणत्या प्राण्यापासून, पक्ष्यापासून आणि मनुष्यापासून कोणत्या प्राण्याला पक्ष्याला धोका आहे, हे स्पष्ट होईल. 
- ज्ञानेश्वर राईतकर,वेटनरी डॉक्टर, गोभणी, जि. वाशीम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com