esakal | नवरात्रोत्सवापासून सोन्याची खरेदी वाढणार, ग्राहकांची सराफा मार्केटमध्ये लगबग वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

636832566173271974-gold-souk

कोरोनानंतर सर्व क्षेत्रे अनलॉक केली जात आहेत. अनलॉक झाल्यानंतर मध्यंतरी सोन्याचा दर ६० हजार रुपयांपर्यंत गेला होता. आता हा दर ५१ हजारापर्यंत कमी झाल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीची लगबग वाढली आहे.

नवरात्रोत्सवापासून सोन्याची खरेदी वाढणार, ग्राहकांची सराफा मार्केटमध्ये लगबग वाढली

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोरोनानंतर सर्व क्षेत्रे अनलॉक केली जात आहेत. अनलॉक झाल्यानंतर मध्यंतरी सोन्याचा दर ६० हजार रुपयांपर्यंत गेला होता. आता हा दर ५१ हजारापर्यंत कमी झाल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीची लगबग वाढली आहे. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे जूनपर्यंत सर्व बाजारपेठा बंद होत्या. कोरोनानंतर मात्र सोन्याला चांगलीच झळाली मिळाली. सोन्याच्या किमती ७० हजारांच्या घरात जातील अशी शक्यताही वर्तविण्यात आली होती; मात्र गेल्या महिनाभरात सोन्याच्या किमती ९ ते १० हजारांनी कमी झाल्या आहेत.

शहागंजच्या घड्याळाची पुन्हा टिकटिक! दोन आठवड्यांत कामाला सुरुवात

यामुळे सर्वसामान्य खरेदीदार पुन्हा सोने खरेदीकडे वळला आहे. भारतीय संस्कृतीत सोन्याला विशेष महत्त्व आहे. यामुळे दसरा, दिवाळी, गुढीपाडवा यासह घरातील लग्नकार्यासाठी सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळेच अनुषंगाने शहर व जिल्ह्यातील सोने चांदीच्या दुकानात खरेदीसाठी ग्राहक दिसू लागला आहे. सध्या सोने ५१ हजार ५०० रुपये तोळे, तर चांदी ६३ हजार रुपये किलोने विक्री होत आहेत. दसऱ्यानंतर सोन्याच्या किमतीत एक हजाराहून अधिकची वाढ होण्याची शक्यता आहे. दर कमी झाले आणि अनलॉक झाल्याने खरेदीसाठी ही सुवर्ण संधी असल्याचे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले, गोदावरी दुथडी वाहू लागली


सोने बाँड खरेदीकडे कल
घरातील लग्न कार्यासाठी लागणारे सोन्याची जमवा-जमव प्रत्येक जण करत असतो. त्याच अनुषंगाने सोने प्रत्येक सणाला खरेदी करतात. तर काही जण सोन्याच्या बाँडच्या माध्यमातून गुंतवणूक करून ठेवतात. राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून बॉंड खरेदी केले जातात. गोल्ड बाँड योजना १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येत आहे. यात यंदा रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार गोल्ड बॉंडची किंमत पाच हजार ५१ रुपये प्रतिग्रॅम निश्‍चित केली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांना प्रतिग्रॅम ५० रुपये सूट देण्यात येणार आहेत. बँक, पोस्टाच्या माध्यमातून हे गोल्ड बॉंड खरेदी केले जाऊ शकतात. गोल्ड बॉंड योजनेकडे अनेकजण वळत आहेत. अनेक जण या गोल्ड बॉंड योजनेची आतुरतेने वाट पाहत असतात. असे सराफा असोसिएशन व बँकांतर्फे सांगण्यात आले.


अनलॉक झाल्याने खरेदीसाठी ग्राहक बाहेर पडत आहे; मात्र हे प्रमाण अजूनही कमीच आहे. दसऱ्यानंतर मात्र बाजारपेठ उसळी घेण्याची शक्यता आहे.
- राजेंद्र मंडलिक, अध्यक्ष, सराफा असोसिएशन.