esakal | पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांमध्ये मोठी नाराजी
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

खासदारांच्या मानधनामध्ये तीस टक्‍क्‍यांऐवजी पन्नास टक्के कपात करण्यास देखील आमची तयारी आहे. परंतु आमच्या हक्काचा खासदार निधी मतदारसंघात खर्च करण्याचा अधिकार हिरावून घेणे योग्य नाही.

पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांमध्ये मोठी नाराजी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : केंद्र सरकारने सर्व खासदारांचा दोन वर्षांचा खासदार निधी आरोग्य विभागाकडे वळवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचा दावाही एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. यामध्ये सत्ताधारी भाजप पक्षाचेही अनेक खासदार असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्रिमंडळातील मोजक्या लोकांनी एकाही खासदाराला विश्वासात न घेता दोन वर्षांचा खासदार निधी आरोग्य विभागाकडे वळवण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. खासदारांचे मानधन तीस टक्के कपात करण्याचा निर्णयदेखील सरकारने घेतला. सरकारच्या आतापर्यंतच्या चुकीच्या धोरणामुळेच खासदार निधीवर गंडांतर आले असल्याचा आरोपही खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. 

देशावर ओढवलेल्या संकटाच्या काळात हा निर्णय योग्य वाटत असला, तरी या निर्णयामुळे त्या-त्या भागातील जनतेवर अन्याय केल्यासारखेच असल्याची टीकाही खासदार इम्तियाज जलील केली.

खैरे म्हणतात, मी मरेपर्यंत....

इम्तियाज जलील म्हणाले, की दोन वर्षांचा खासदार निधी आरोग्य विभागाकडे वळवणे हा निर्णय त्या मतदारसंघातील जनतेवर अन्याय करणारा ठरेल. देशावर मोठे संकट आहे, याची जाणीव मलाही आहे. परंतु, खासदार निधी परस्पर आरोग्य विभागाकडे वळवण्याऐवजी तो संबंधित खासदारांना त्यांच्याच मतदारसंघांमधील आरोग्यसुविधांसाठी व त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी वापरणे बंधनकारक करायला हवे होते. 

कावेरी जातीची अंडी मिळतील औरंगाबादच्या या केंद्रात  

हा निधी केवळ आरोग्यासंबंधीच्या सोयीसुविधा अद्ययावत करण्यासाठी केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना केल्या असत्या, तरीही हेतू साध्य झाला असता. कारण माझ्या मतदारसंघात आरोग्याच्या दृष्टीने कुठल्या गोष्टी करणे आवश्यक आहे, हे दिल्लीत बसलेल्या अधिकार्‍यापेक्षा मला जास्त चांगल्या पद्धतीने कळू शकेल आणि त्यामुळे खासदार निधीचा योग्य ठिकाणी वापर करून आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यास मदत झाली असती, असेही ते म्हणाले.

बुलेट ट्रेन, पुतळ्यांवर हजारो कोटी कशासाठी?

केंद्र सरकारने एकाही खासदाराला विश्वासात न घेता निधी वळवण्याचा निर्णय जाहीर केला. मुळात केंद्र सरकारवर असा निर्णय घेण्याची वेळ आली, त्याला सर्वस्वी आतापर्यंत राबवलेली चुकीची धोरणे कारणीभूत ठरली आहेत. ज्या देशामध्ये आरोग्य यंत्रणाच दुबळी आहे, अशा देशात पुतळ्यांवर तीन तीन हजार कोटी रुपये खर्च केले जातात, बुलेट ट्रेन आणण्याची भाषा केली जाते, हे दुर्दैवी असल्याचा टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावला. 

खासदारांच्या मानधनामध्ये तीस टक्‍क्‍यांऐवजी पन्नास टक्के कपात करण्यास देखील आमची तयारी आहे. परंतु आमच्या हक्काचा खासदार निधी मतदारसंघात खर्च करण्याचा अधिकार हिरावून घेणे योग्य नाही. केंद्राने दोन वर्षांचा खासदार निधी आरोग्य यंत्रणेसाठी खर्च करावा, असे बंधनकारक करणे योग्य ठरले असते, याचा पुनरुच्चारही इम्तियाज जलील यांनी केला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

loading image
go to top