esakal | मोटर वाहन कायद्याअंतर्गत पंधरा वर्षे चाललेली वाहने भंगारात जाणार - नितीन गडकरी
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gadkari

पर्यावरणपुरक वेगवेगळया इंधनावर स्टार्ट अप सुरु करून संशोधन करावे. यातून पेट्रोल-डिझेलला पर्याय उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी(ता.१६) केले.

मोटर वाहन कायद्याअंतर्गत पंधरा वर्षे चाललेली वाहने भंगारात जाणार - नितीन गडकरी

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : केंद्र सरकारचा नवीन मोटर वाहन कायद्याअंतर्गत पंधरा वर्षे चाललेली वाहने भंगारात जाणार आहेत. याच भंगारातून अल्युमिनियम व वेस्टपासून वेल्थ निर्मिती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासह बायोफिल, सीएनजी, एलएनजी असे पर्यावरणपुरक वेगवेगळया इंधनावर स्टार्ट अप सुरु करून संशोधन करावे. यातून पेट्रोल-डिझेलला पर्याय उपलब्ध होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी(ता.१६) केले.


सीएमआयएच्या मराठवाडा अॅक्सीलरेटर फॉर ग्रोथ इन्क्युबेशन कौन्सिल (मॅजिक)तर्फे आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेचे उद्‍घाटन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. सीएमआयएचे अध्यक्ष कमलेश धूत, मॅजिकचे संचालक आशिष गर्दे, प्रसाद कोकिळ, रितेश मिश्रा, शिवप्रसाद जाजू, विवेक देशपांडे यांची प्रमुख उपस्थित होते.


श्री. गडकरी म्हणाले, जुने वाहने भंगारात जाणार आहेत. यासह आता नवीन वाहने सीएनजी,एलएनजीवर चालविण्याचा प्रयत्न होत आहे. जगभरात वाहनांच्या उत्पादनाचा प्रवास झपाट्याने बदलत आहे. स्टार्ट अप्सनी पर्यायी इंधनाबाबत संशोधन करण्याची गरज आहे. बायोसीएनजी, एलएनजी आदी काही उदाहरणे आहेत. त्याकडे उद्योजकांनी लक्ष दिले पाहिजे. मोठी वाहने उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना वाहनांचे सुटे भाग कमीत कमी आयात करावेत, स्थानिक लघुउद्योगांना प्रोत्साहन द्यावे.

यासाठी होणारा त्रास सहन करा, काही कालावधीनंतर आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत लघुउद्योजक स्थिरावतील. देशाच्या जीडीपीत कृषी विभागाचा मोठा वाटा आहेत. यातील नवीन पिक पध्दतीवर संशोधन आणि अभ्यास व्हावा. बांबू शेती ॲग्री प्रोसेसिंगचे उद्योगाकडे वळवते.दरम्यान औरंगाबाद-अजिंठापर्यंतचा रस्ता खराब असल्याचे श्री.गडकरी यांनी मान्य केले. यासह प्रलंबित असलेले हायवेचे कामे पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

कमी अंतराची शहरे जोडावीत
रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प राबविला जात आहे. विदर्भात ३६ ट्रेनचा प्रस्ताव आहे. यातून नागपुर- चंद्रपूर, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया जोडले जाईल. मराठवाड्यातील उद्योजकांनी ब्रॉडगेज मेट्रोसाठी पुढाकार घेत या प्रकल्पाबाबत विचार केला तर औरंगाबाद - नांदेड, नांदेड - लातूर, सोलापूर - औरंगाबाद दरम्यान या सेवा सुरु करता येतील. या प्रकल्पाचे बिझनेस मॉडेल कसे आहे.

याबाबत गडकरांनी सविस्तर माहिती दिली. कृषीपूरक उद्योग सुरु करण्यावर भर द्यावा, नवीन संधींकडे स्टार्टअप्सनी लक्ष केंद्रित करीत नीतीमत्ता, अर्थकारण, पर्यावरण या तीन गोष्टी सांभाळून व्यवसाय, उद्योग करावा, असे आवाहन श्री. गडकरी यांनी केले. आशिष गर्दे यांनी प्रास्तविक केले. सीएमआयचे अध्यक्ष कमलेश धूत यांनी उद्योगविषयक मागण्या मांडल्या. रितेश मिश्रा यांनी मॅजिकच्या वाटचालीची माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे केली. प्रसाद कोकिळ यांनी आभार मानले.

संपादन - गणेश पिटेकर

loading image