
सभेचे नियम मोडल्याने राज ठाकरेंवर कारवाई होणार? पोलीस म्हणतात...
राज ठाकरे यांच्या औरंगाबाद इथल्या सभेनंतर आता मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई होत आहे. मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवण्यात येत असून औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई सुरू झाली आहे. औरंगाबाद पोलिसांनी दिलेल्या सर्व अटींचं पालन झालं आहे का? नसेल झालं तर कारवाई होणार का याबद्दल पोलिसांनी माहिती दिली आहे.
औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी काही अटी घालून दिल्या होत्या. या अटींचं पालन सभेदरम्यान झालं का, याची शहानिशा पोलीस करणार आहेत. या सभेची संपूर्ण टेप औरंगाबाद पोलीस ऐकणार असून त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा: सभा सुरु असताना आजान सुरु झाली अन् राज ठाकरे संतापले!
काय होत्या सभेसाठीच्या अटी?
सभा संध्याकाळी ४.३० ते रात्री ९.४५ या दरम्यान आयोजित करण्यात यावी
सभेत सहभागी होणाऱ्यांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना किंवा जाताना कोणत्याही प्रकारचं असभ्य वर्तन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सभेसाठी येणाऱ्या सर्व वाहनांनी पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गानंच प्रवास करावा. आयोजकांनी वाहनचालकांना तशा सूचना द्याव्यात. तसेच, या वाहनांनी वेगमर्यादेचं देखील पालन करावं. ही वाहने पार्किंगसाठी निर्धारित केलेल्या ठिकाणीच लावावीत. तसेच, सभेसाठी येताना वा जाताना कोणत्याही प्रकारे रॅली काढू नये.
हेही वाचा: औरंगाबाद : राज ठाकरेंच्या सभेतील पाच महत्वाचे मुद्दे; जाणून घ्या
सभेसाठी आयोजकांनी स्वयंसेवकांची नेमणूक करून त्यांची नावे, मोबाईल नंबर, त्याचप्रमाणे शहराबाहेरून येणाऱ्यांच्या वाहनांची संख्या, येण्या-जाण्याचा मार्ग, लोकांची अंदाजित संख्या याची माहिती नजीकच्या पोलीस स्थानकास द्यावी.
सभेच्या ठिकाणी आसनव्यवस्था १५ हजार लोकांची असल्यामुळे त्यापेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करू नये. गर्दी वाढून ढकलाढकली, चेंगराचेंगरी झाल्यास त्यासाठी आयोजक जबाबदार असतील.
सभास्थानी सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी नेमून दिलेल्या जागी बॅरिकेट्स लावावेत. सभेसाठी येणाऱ्या नागरिकांची सुरक्षेसाठी योग्य ती तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना राहील. त्यात व्यत्यय येणार नाही याची दक्षता घ्यावी.
सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा, वर्ण, प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असलेल्या प्रथा किंवा परंपरा यावरून कोणत्याही प्रकारे चिथावणीखोर वक्तव्य, घोषणाबाजी, कृती करू नये.
सभेसाठीच्या ध्वनिक्षेपकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे. त्याचा भंग केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार ५ वर्षांचा तुरुंगवास आणि १ लाखांचा दंड अशी शिक्षा होऊ शकते.
हेही वाचा: प्रबोधनकारांच्या पुस्तकांवरुन राज ठाकरेंचा शरद पवारांना सवाल; म्हणाले....
कार्यक्रमादरम्यान वा सभेमध्ये शस्त्र, तलवारी, स्फोटकं बाळगू नयेत. शस्त्र अधिनियमातील तरतुदींचा भंग करू नये.
या सर्व अटींची माहिती आयोजकांनी सभेत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना द्यावी.
कार्यक्रमादरम्यान शहर बस सेवा, रुग्णवाहिका, दवाखाना, मेडिकल, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, दळण-वळण अशा अत्यावश्यक सुविधांना बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.
सभेच्या दिवशी वाहतूक नियमनासाठी पोलिसांकडून काढून दिली जाणारी अधिसूचना सर्व संयोजक, वक्ते आणि सभेला येणाऱ्या नागरिकांना बंधनकारक असेल.
सभेला येणाऱ्या महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था, पिण्याचे पाणी आणि स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी.
सभेसाठीची बॅरिकेट्स, विद्युत यंत्रणा, मंडप, लाऊड स्पीकर्स सुस्थितीत असल्याची खात्री करावी. विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्यास जनरेटर्सची सुविधा आधीच करावी.
सभेदरम्यान अन्नदान किंवा मिठाई वाटप होणार असेल, तर त्यातून विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी
Web Title: Raj Thackeray Aurangabad Mns Rally Aurangabad Police Rules Of Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..