औरंगाबाद : राज ठाकरेंच्या सभेतील पाच महत्वाचे मुद्दे; जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray
औरंगाबाद : राज ठाकरेंच्या सभेतील पाच महत्वाचे मुद्दे; जाणून घ्या

औरंगाबाद : राज ठाकरेंच्या सभेतील पाच महत्वाचे मुद्दे; जाणून घ्या

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमधील हायव्होल्टेज सभा नुकतीच पार पडली. या सभेत राज ठाकरे काही नवे मुद्दे मांडतील अशी अपेक्षाही व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांनी जुनेच मुद्दे पुन्हा आधोरेखित केले आहेत. काय म्हणालेत राज ठाकरे पाहुयात... (Here are five key points from Raj Thackeray meeting in aurangabad)

१) शरद पवार - या लोकंनी महाराष्ट्रात जातीचं विष पसरवलं. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात ज्यांनी शिवाजी महाराज घराघरात पोहोचवले त्यांच्या वृद्धापकाळात शरद पवारांनी आमच्या बाबासाहेब पुरंदरेंना त्रास द्यायला सुरुवात केली. केवळ ते ब्राह्मण आहेत म्हणून. पवारांना एकच गोष्ट सांगतो आम्हाला जातपात माहिती नाही आणि आम्हाला जातीपातीशी घेणं देणं नाही. मी जात बघून पुस्तकं वाचत नाही. पवारांना हिंदू या शब्दाचीच अॅलर्जी आहे. अठरापगड जातींमध्ये विष कालवलं तुम्ही.

२) प्रबोधनकार ठाकरे - प्रबोधनकार वाचले का असा प्रश्न विचारला जातो. पण प्रबोधनकार तुम्हाला अपेक्षित आहेत तसे तुम्ही वाचता. त्यांची सर्व पुस्तकं तुम्ही वाचा तेही संदर्भासहित मग तुम्हाला कळेल. माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलंय जातीपातीत भेद निर्माण करणारं नव्हे. हिंदू धर्म मानणारा आणि त्याची पुजा करणारा माणूस होता तो. धर्मातील चुकीच्या गोष्टी न मानणारे ते होते. भटभिक्षुकीच्या विरोधात होते.

३) जेम्स लेन - जेम्स लेनच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीतील काही प्रश्नांचा त्यांनी दाखला दिला. आपण बाबासाहेब पुरंदरेंशी मी कधीही बोललो नाही. युक्तीवाद करताना मी पुरेशी काळजी घेतली नाही त्याची शिक्षा इतरांना भोगावी लागली म्हणून मी माझे शब्द मागे घेतले. या मुद्द्यावरुन पवारांनी दहा-पंधरा वर्षे राजकारण केलं.

४) लाऊडस्पीकर - लाऊडस्पीकरचा विषय नवा नाही यापूर्वी तो अनेकांनी माडंला मी फक्त त्याला हनुमान चालीसाचा पर्याय दिला. मला महाराष्ट्रात कुठेही दंगली घडवायची इच्छा नाही. मुस्लिम समाजानं हे समजून घेणं गरजेचं आहे. लाऊडस्पीकर या विषयाला जर तुम्ही धार्मिक वळण देणार असाल तर त्याचं उत्तर आम्हाला धर्मानं द्यावं लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा. आमची इच्छा नसताना आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. उत्तर प्रदेशात जर लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही? ३ तारखेला ईद आहे पण ४ तारखेपासून ऐकणार नाही.

५) अजान - माझी पोलिसांना विनंती आहे की माझ्या सभेच्यावेळी जर हे अजान सुरु करणार असतील तर आपण अत्ताच्या आत्ता ताबडतोब ते थांबवावं. त्यांना सरळ मार्गानं जर समजत नसेल तर मला माहिती नाही. हे जर या पद्धतीनं वागणार असतील तर महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे हे एकदा दाखवावीच लागेल. सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरले पाहिजेत पण आधी मशिदीवरील भोंगे उतरल्यानंतरच.