esakal | जयसिंगराव गायकवाडांच्या राजीनाम्याने वाढणार भाजपची डोकेदुखी, करताहेत सतीश चव्हाणांचा प्रचार
sakal

बोलून बातमी शोधा

Former Union Minister For State Jaysingrao Gaikwad

भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी (ता.१७) तडकाफडकी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली.

जयसिंगराव गायकवाडांच्या राजीनाम्याने वाढणार भाजपची डोकेदुखी, करताहेत सतीश चव्हाणांचा प्रचार

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी (ता.१७) तडकाफडकी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली. पक्ष कुठलीच जबाबदारी देत नसल्याने या पक्षात राहून काय करू? असा प्रश्‍न उपस्थित करत गायकवाडांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच गायकवाड यांनी पक्षाचा राजीनामा देत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा प्रचार सुरू केला आहे. बुधवारी (ता.१८) औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील काही तालुक्यांत त्यांनी सभा घेतल्या. गायकवाड यांच्यासह रमेश पोकळे यांच्या बंडखोरीमुळेही भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

आमदार प्रशांत बंबसह १६ जणांवर गुन्हा दाखल, बनावट दस्तावेज केल्याचा ठपका


तीनवेळा खासदार, केंद्रात राज्यमंत्री, पदवीधरचे आमदार, राज्यात मंत्री अशी अनेक पदे गायकवाड यांनी भूषविली. त्यानंतर गेली कित्येक वर्षे ते राजकारणापासून अलिप्त होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अचानक जयसिंगरावांना भाजपने तयारी करायला सांगितली. त्यांनी तीन महिने संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. कार्यकर्त्यांच्या भेटी घेत मोर्चेबांधणी केली; पण युती झाल्याने त्यांना माघार घ्यावी लागली.

पदवीधर निवडणुकीसाठी त्यांनी मतदारांची चागंली मोट बांधली होती. त्यांनी उमेदवारी मागितली. मात्र, पक्षाने त्यांनी डावलले. यामुळे नाराज झाल्याने त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. बुधवारपासून त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चव्हाण यांच्यासाठी कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, भोकरदन येथे पदवीधरांशी संवाद साधला. गुरुवारी ते गंगापूर, वैजापूर, पैठण आणि अंबड या तालुक्यांतील पदवीधरांशी संवाद साधणार आहेत. तर दुसरीकडे रमेश पोकळे यांच्यामुळे भाजपला मोठा फटका बसला आहे. पक्षातर्फे कार्यकर्त्यांची समजूत काढत कामाला लावण्याचे काम सुरू आहे.

जयसिंगराव नाथाभाऊंच्या संपर्कात
ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड हे भाजपचा राजीनामा देण्यापूर्वीपासून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या संपर्कात होते. राजीनामा दिल्यापासून ते आतापर्यंत संपर्कात आहेत. यातून ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
खडसे यांच्याच उपस्थितीत १७ नोव्हेंबरला जयसिंगराव उमेदवारी अर्ज मागे घेणार होते. यासाठी खडसेंची वेळही ठरली होती. मात्र खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे क्वारंटाइन झाल्याने एकनाथ खडसे यांनाही क्वारंटाइन व्हावे लागले. यामुळे त्यांचा औरंगाबाद दौरा रद्द झाला. मात्र, आजही ते नाथाभाऊंच्या संपर्कात आहेत.


जयसिंगराव गायकवाड यांनी शेवटपर्यंत भाजप सोबत राहावे अशी आमची इच्छा होती. मराठवाड्यात भाजप वाढवण्यात जयसिंगरांवाचा मोठा वाटा होता. इतकी वर्षे पक्षात काम केल्यानंतर त्यांनी अचानक भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे मनाला वेदना झाल्या. जयसिंगराव हे माझे सहकारी होते, पक्षात आम्ही अनेक वर्षे सोबत काम केले. त्यांच्या निर्णयामुळे धक्का बसला. भाजपसोबत ते कायम राहावेत अशी माझी इच्छा आहे. तथापि, पदवीधरच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही. भाजपने मराठवाडा पदवीधर मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यासाठी शक्ती पणाला लावली आहे.
-रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री

जयसिंगराव गायकवाड यांना पक्षाने भरपूर दिले. त्यानंतरही एखादेही पद नाही मिळाले म्हणून पक्षावर राग व्यक्त करणे हे काही बरोबर नाही. पक्षाने त्यांना गेली २५ वर्षे सगळे दिले आहे. असे असताना पक्षाविरोधात रोष व्यक्त करणे बरोबर नाही. आम्ही त्यांना विनंती केली होती, की पक्ष सोडू नका. निवडणुकीत परिणाम होऊ न देण्यासाठी तेवढ्याच ताकदीने काम करणार आहोत. जयसिंगरावांबरोबरचे कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. त्यांचाच कार्यकर्ता असलेले शिरीष बोराळकर यांना पक्षाने संधी दिली. याचा राग त्यांनी मानू नये.
-अतुल सावे, आमदार


भाजप पक्ष हा एक परिवार आहे. परिवारातील एखादा सदस्य जातो, त्याचे दु:ख होते. भाजप हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा ठाकलेला पक्ष आहे. निश्‍चितपणे कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्ष पुढे जाईल. कोणतीही निवडणूक असो, कार्यकर्ता जिवाचे रान करतो. अनेक पदे आजी-माजी होत असतात; पण कार्यकर्ता माजी होत नाही, हे त्यांनीच आम्हाला सांगितले होते.
- संभाजी पाटील निलंगेकर - आमदार तथा मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रमुख

संपादन - गणेश पिटेकर 

loading image