Marathwada Muktisangram 2023 : शिक्षणाचे वास्तव Shrirang Deshpande writes marathwada muktisangram amritmahotsav year 2023 Education reality of education | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Education

Marathwada Muktisangram 2023 : शिक्षणाचे वास्तव

- डॉ. श्रीरंग देशपांडे

महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज खेड्यापाड्यातून मोठ्या जोशात साजरी होते. त्यांना घेऊन आपण आपल्या अस्मितेच्या लढायापण खेळतो. परंतु, आपण या दोन महामानवांना उत्सव आणि अस्मिता एव्हढ्यापुरतेच मर्यादित ठेवलेले आहे, हे कटू सत्य आहे. या दोघांनीही दिलेल्या एका महत्त्वाच्या संदेशाला आपण अजूनही गांभीर्याने घेतलेले नाही. तो महत्त्वाचा संदेश म्हणजे शिक्षण.

द्येविना मती गेली, मतिविना नीति गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले’ ही महात्मा फुलेंची ओवी आणि ‘शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे’ हे बाबासाहेबांचे वाक्य आपल्याला पाठ आहे, वेळप्रसंगी भाषणात आपण ठोकूनही देतो; पण प्रत्यक्षात काय करतो? कष्टकरी वर्गात आणि ग्रामीण भागात आजही शिक्षणाला प्राधान्य दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. पोटाच्या विवंचनेने म्हणा किंवा अजून काही कारणाने, शाळा आणि अभ्यास हे बहुसंख्य कुटुंबात दुय्यम स्थानी आहे. शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात आणि त्याची उपयुक्तता वाढवण्यात आपल्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही हे मान्य करावे लागेल. नवीन शैक्षणिक धोरण जरी परिणामकारकरीत्या राबविता आले तर या त्रुट्या बऱ्याच अंशी दूर होतील अशी आशा आहे. शिक्षण सार्थक करण्यासाठी आपण, म्हणजे पालक-शिक्षक-संस्थाचालक, आपल्यापरीने काय करू शकतो याचे थोडे चिंतन करू.

शिक्षण म्हणजे काही वर्षे शाळा, महाविद्यालयात जाऊन एखादे प्रमाणपत्र मिळवणे नव्हे. शिक्षणाने आपल्यातील सुज्ञपणा जागा झाला पाहिजे, उत्तरोत्तर वाढला पाहिजे. दुसरे असे की, आपण जे शिकतो त्याचा आपल्या जगण्याशी प्रत्यक्ष संबंध असला पाहिजे, ते आपल्या आयुष्यात उतरले पाहिजे. तसे किती प्रमाणात होते? आपण गणित शिकतो; पण आपली बुद्धी गणिती झाली का? आपल्या आयुष्याच्या समस्यांचे समीकरण मांडून त्यांचे उत्तर काढण्याची बुद्धी किती प्रमाणात विकसित झाली? समस्या निर्माण करणारे, वाढवणारे लोकच अवतीभवती जास्त दिसतात! समस्यांच्या मुळाशी जाऊन उपाय शोधणारे व तो उपाय अमलात आणणारे किती आहेत? बहुतेक जण स्वतःच्या समस्यांच्या उत्तरासाठी कोणाच्यातरी तोंडाकडे आशाळभूतपणे पाहत असतात, कोणाच्यातरी मदतीची अपेक्षा करत असतात.

आपण विज्ञान शिकतो; पण तर्कशुद्ध विचारप्रणाली किती जणांना लाभते? भले आपल्याला विज्ञानाचे मोठमोठे सिद्धांत पाठ असतील; पण रोजच्या व्यवहारातील साध्यासाध्या गोष्टींचे विश्लेषण करायला आपली बुद्धी तयार नसेल तर त्या सिद्धांतांचा उपयोग काय? एक साधी बाब आहे. आपला धर्म त्याग आणि निःस्वार्थाता शिकवतो. आपले संत, शुकदेवापासून ते साईबाबांपर्यंत, शंभर टक्के त्यागी होते. त्यांनी संस्थाने उभी केली नाहीत. त्यांना गाड्याघोडे, ऐश्वर्य नव्हते. जाहिराती करून त्यांनी कधी कथा, कीर्तन, प्रवचने केली नाहीत. उपदेशांचा, लोकजागराचा मोबदला कधी घेतला नाही; हे ज्ञात असूनही आज आपण कोणाच्या मागे धावत आहोत, कोणाला संत म्हणत आहोत, कोणाला डोक्यावर बसवून उन्मादाने नाचतो आहोत? ज्यांची कोट्यवधींची संपत्ती आहे, ज्यांचे जीवनमान पंचतारांकित आहे, विमानाशिवाय, आलिशान गाड्यांशिवाय जे प्रवास करत नाहीत, पद आणि प्रतिष्ठा ज्यांना महत्त्वाची वाटतात अशी आपल्यासारखीच जीवनमूल्ये असणारी मंडळी संत कसे असू शकतात? इतकाही विचार जर आपण करू शकत नसू तर विज्ञान शिकण्याचा उपयोग काय? आपल्याला इतिहास शिकवला गेला.

त्यातून आपण काय आत्मसात केले? भीष्माने जी चूक केली तीच चूक स्वातंत्र्याच्या काळातील नेत्यांनी केली आणि आजही तसेच भीष्म आहेत! काय केल्याने किंवा काय टाळल्याने काय साधते हे जर इतिहासातून आपण शिकलो असतो तर कोरेगाव भीमा प्रसंग उद्भवला नसता. कार्यकारण भाव जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत इतिहास वगळून, बदलून, शहरांचे नामांतर करून तात्पुरत्या उन्मादापलीकडे काही साध्य होणार नाही. यासारख्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. आपण जे विषय शिकवत आहोत त्याद्वारे काय साध्य करायचे आहे याचे मुळात शिक्षकांनाच प्रबोधन झाले पाहिजे.

नवीन मराठी शाळांना परवानगी मिळत नाही. त्यामानाने स्वयंअर्थसहाय्यित इंग्रजी शाळांना विनासायास परवानगी मिळते. ग्रामीण भागातील मुले-मुली अगदी वीस-तीस किलोमीटर लांब असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायला बसने रोज जा-ये करतात; पण घराजवळच्या मराठी माध्यमाच्या शाळेत जात नाहीत. शासन एकीकडे मराठी माध्यमातून अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण द्यायला निघाले आहे आणि इकडे पालकवर्ग, अगदी ग्रामीण भागातीलही, आपल्या पाल्यासाठी इंग्रजी माध्यमाची शाळा शोधतो आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसारखे अभ्यासक्रम मराठीतून शिकवण्याची शासनाची भूमिका जशी अतिरेकी आहे तशी पालकांची इंग्रजी माध्यमासाठीची आग्रही भूमिकाही अतिरेकी आहे. मातृभाषेतून शिकणे चांगलेच आहे यात शंका नाही; पण व्यवहारात इंग्रजीला पर्याय देणे नजीकच्या भविष्यात शक्य होईल याची कोणाला खात्री नाही.

मराठीत शिकलेल्या मराठी माणसाला उद्या तामिळनाडू, बंगाल, पंजाब, केरळ, कर्नाटक या राज्यांत खासगी नोकरी किंवा व्यवसायात टिकता येईल का? नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी परदेशात जाता येईल का? आपण अजून विकसित राष्ट्र नाही, विकसनशील राष्ट्र आहोत. अनेक क्षेत्रांत आपल्याला अजून अनेक वर्षे इतरांवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे इंग्रजीचे महत्त्व कमी लेखून चालणार नाही. इतर देशांना आध्यात्मिक ज्ञानासाठी, योगाभ्यासासाठी आपली गरज आहे; गरजेपोटी त्या विषयांचे जिज्ञासू संस्कृत, हिंदी शिकतात. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात मात्र आपल्याला त्यांची भाषा शिकणे गरजेचे आहे. बरे, व्यापार उदिमाच्या बळावर आपण इतके समृद्धही नाही की केवळ अर्थव्यवस्थेच्या जोरावर आपण आपल्या भाषेचा आग्रह लावून धरावा. म्हणून भाषेचा वृथा अभिमान बाळगणे इष्ट नाही. त्याचवेळी आपल्या भाषेचा न्यूनगंडही बाळगणे इष्ट नाही. शिक्षणात अशी व्यवस्था असावी की प्रत्येकाला मातृभाषेचा अभिमान असावा आणि इंग्रजीचा न्यूनगंड नसावा.

विसेक वर्षे झाले असतील. पंचविशीचा तरुण माझ्याकडे आला होता. काय करतोस असे विचारल्यावर म्हणाला, स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. कुतूहलाने विचारले, काय व्हायचंय? म्हणाला, उपजिल्हाधिकारी नाहीतर पोलिस उपअधीक्षक. मी म्हणालो, हेच का? त्यावर त्याने दिलेले उत्तर अजूनही माझ्या कानात घुमतंय. त्याचे उत्तर होते, ‘पाच वर्षांत जिंदगी बनते!’ फार मोठ्या संख्येने तरुणवर्ग लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या नादी लागलेला आहे. ते एक मृगजळ आहे हे त्यांना कोणी सांगत नाही. अनेक वर्षे खपूनही जेव्हा यश येत नाही तेव्हा समोर फक्त अंधार दिसतो. लाखोंच्या संख्येने स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्यांपैकी मूठभर यशस्वी होतात, बाकीच्यांना नैराश्य ग्रासून

टाकते. मात्र, या तरुणांच्या जिवावर एक मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या संस्था स्वतः सात पिढ्यांची तजवीज करून घेतात, विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर सात पिढ्यांचे कर्ज चढते. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची नितांत आवश्यकता आहे. शैक्षणिक जीवनात महत्त्वाच्या टप्प्यावर कल चाचणी होणे नितांत आवश्यक आहे. काही होण्याची हौस असणे वेगळे आणि तिकडे आपला कल आहे का हे तपासून वस्तुस्थितीचे भान बाळगून रस्ता निवडणे वेगळे. बहुतेक पालक स्वतःच्या व आपल्या पाल्याच्या हौसला क्षमता समजतात. प्रत्येक शाळेत इयत्ता नववीत व महाविद्यालयात बारावीनंतर कल चाचणी आणि समुपदेशन झाले पाहिजे. ग्रामीण भागात याची विशेष गरज आहे.

(लेखक शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)