सुनील केंद्रेकरांचे आदेश आता तरी अधिकारी पाळतील का?

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढते आहे. या अनुषंगाने गुरुवारी (ता.२५) आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी तक्रारींचा पाढाच वाचला. त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या तक्रारी तातडीने सोडविण्यात याव्यात, असे लेखी आदेशच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अपयशी ठरणारे अधिकारी आता तरी श्री. केद्रेकरांचे आदेश पाळतील का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थीत केला जात आहे.

शहरामध्ये वेगाने वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्‍यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप सामान्य जनतेतून होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींची विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यात विलगीकरण कक्षामध्ये जास्तीत जास्त लोकांना ठेवण्यात यावे, याठिकाणी आवश्यक त्या सुविधा देण्यात याव्यात, जेवण, नाश्ता चहा वेळेवर देण्यात यावेत, यासह प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावर श्री. केंद्रेकर म्हणाले, की लोकप्रतिनिधींच्या तक्रारी तातडीने सोडविण्यात याव्यात, असे लेखी आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. विलगीकरण कक्षाची संख्या वाढवावी, प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना जिल्हा सामान्य रुग्णालयातच दाखल करायला हवे. अन्य ठिकाणी पुन्हा कोविड रुग्णालय सुरू करता येईल का, याचीही माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे. लॉकडाउन करून कोरोनाला रोखता येणार नाही. त्यासाठी लोकांनी शिस्त पाळायला हवी, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, कुठेही स्पर्श करू नये, अशा वैयक्तिक संरक्षणाच्या बाबी पाळायला हव्यात.

जर काही लक्षणे जाणवत असतील तर तातडीने डॉक्टरांना दाखवावे. होम क्वारंटाइनचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे संशयितांना विलगीकरण कक्षातच ठेवण्यात यावे, मधल्या काळात मुंबई आणि पुणे अशा भागातून मोठ्या प्रमाणात लोक शहरात आलेली आहेत. त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेतली की नाही, हा प्रश्नच आहे. यापुढे प्रत्येक विलगीकरण सेंटरच्या ठिकाणी महसूलच्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल.

खासगी रुग्णालयात रुग्णांकडून पैसे उकळण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.२६) सकाळी ११ वाजता खासगी डॉक्टरांची बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीला खासदार इम्तियाज जलील, डॉ. भागवत कराड, आमदार सतीश चव्हाण, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार अंबादास दानवे, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वर्षा ठाकूर, पराग सोमण, सखाराम पानखडे, संजीव जाधवर, रिता मेत्रेवार उपस्थित होते. 

औषधांच्या नावाखाली लूट 
घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधी आणायला लावली जात आहे. विशेष म्हणजे बैठकीत अधिष्ठाता डॉ. येळीकर सांगतात, की आमच्याकडे पुरेशी औषधी आहे. मग रुग्णांना बाहेरून औषधे का सांगत आहेत, असा सवाल खासदार इम्तियाज यांनी उपस्थित केला. याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. 

सरसकट दुकाने सुरू व्हावेत
शहरात सध्या सम - विषम यानुसार दुकाने उघडली जात आहेत; मात्र हा नियम बंद करून सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी डॉ. भागवत कराड यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com