esakal | पोलिस पाटील महिलेने घेतले विष, ग्रामपंचायतीचा शिपाई करायचा अश्‍लील भाषेत शिवीगाळ
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

ग्रामपंचायतीचा शिपाई हा पोलिस पाटील महिलेला वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करीत होता. याचा त्रास सहन न झाल्याने केळगाव (ता.सिल्लोड) येथील महिला पोलिस पाटलाने गुरुवारी (ता.१०) दुपारच्या सुमारास विषप्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला.

पोलिस पाटील महिलेने घेतले विष, ग्रामपंचायतीचा शिपाई करायचा अश्‍लील भाषेत शिवीगाळ

sakal_logo
By
सचिन चोबे

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : ग्रामपंचायतीचा शिपाई हा पोलिस पाटील महिलेला वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करीत होता. याचा त्रास सहन न झाल्याने केळगाव (ता.सिल्लोड) येथील महिला पोलिस पाटलाने गुरुवारी (ता.१०) दुपारच्या सुमारास विषप्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केळगावच्या पोलिस पाटील निर्मला बाळासाहेब इवरे (वय ३४) यांनी होत असलेल्या त्रासाबद्दल सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात वारंवार तक्रार देण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी याकडे काणाडोळा केल्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, विषप्राशन करण्याआधी निर्मला इवरे यांनी सोशल मीडियावर आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे की, ग्रामपंचायत शिपाई रामदास विठ्ठल वाघ, त्याची आई मीरा वाघ, बहीण सुनीता वाघ हे वारंवार आर्थिक व मानसिक त्रास देऊन अश्लील भाषेत घरासमोर येऊन शिवीगाळ करतात. पोलिस प्रशासन व गावदेखील काहीच करीत नसून, मी वारंवार तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता ग्रामीण पोलिसांनी तक्रार घेतली नाही. सदर व्यक्ती पोलिसांना वारंवार त्यास मारहाण झाल्याच्या खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी देतो. गेल्या तीन वर्षांपासून त्याचा त्रास सहन करीत आहे. घरी पती व कोणी नसताना वाघ हा वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करतो. माझ्या आत्महत्येस पोलिस प्रशासन व गाव जबाबदार राहील, असेही त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.

दरम्यान, महिला पोलिस पाटलाने सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेनंतर महिला पोलिस पाटलास सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर प्रभारी उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल भेट देण्यासाठी रात्री उशिरा येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी सहकाऱ्यासह संबंधित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन माहिती घेतली. सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक पी.पी.इंगळे चौकशी करीत आहेत


केळगावातील वाघ कुटुंब तीन वर्षांपासून वारंवार त्रास देत आहे. याविषयी तक्रार देऊन देखील पोलिसांनी तक्रार न घेता कारवाई केली नाही. यामुळे माझ्या पत्नीने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
आता तरी ग्रामीण पोलिसांनी घटनेची दखल घेऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी.
- बाळासाहेब इवरे
 

Edited - Ganesh Pitekar

loading image