
मंगळवारी केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर औसा शहरातील बहुतांश दुकाने बंद होती. या बंदमध्ये भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांनी सहभाग घेतला होता.
औसा (लातूर) : कृषी विधेयकाच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.आठ) दिलेल्या भारतबंदच्या हाकेला औशात चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतांश प्रतिष्ठाने बंद ठेवून लोकांनी बंदमध्ये आपला सहभाग नोंदवला. दरम्यान केंद्र शासनाच्या जाचक कृषी विधेयकांची अंत्ययात्रा काढून औशात युवक काँग्रेसने हा कायदा रद्द करावा अशी मागणी केली. तिरडीवर या कायद्यांच्या प्रति ठेवून काढलेली अंत्ययात्रा लक्षवेधी ठरली.
हे ही वाचा : दुभाजकात कचरा टाकल्यास होणार कारवाई, लातूर महापालिकेचा निर्णय
मंगळवारी केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर औसा शहरातील बहुतांश दुकाने बंद होती. या बंदमध्ये भाजपा वगळता सर्वच राजकीय पक्षांनी सहभाग घेतला होता. दररोज गजबजलेली बाजारपेठ, भाजीपाला मार्केट पूर्णपणे बंद होते. सकाळी अकरा वाजता युवक काँग्रेससह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केंद्राच्या कृषी विधेयकांची तिरडीवर पांढऱ्या कपड्यात गुंडाळून येथील हनुमान मंदिर ते तहसील कार्यालय या मार्गावर ही अंत्ययात्रा काढण्यात आली.
हे ही वाचा : उमरगा : प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर चौदा गावांतील ४३ जणांचे हरकती व आक्षेप
या अंत्ययात्रेत उलटी हलगी वाजविणे, गाडग्यात विस्तव घालून ते गाडगे तिरडी पुढून नेणे, चार खांदेकरी आदी हुबेहूब वातावरण निर्माण केले होते. किसान विरोधी कायदा रद्द करा, अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा तहसील कार्यालयासमोर थांबविण्यात आली. त्यानंतर सर्वपक्षीय प्रतिनिधींनी आपल्या मागण्याचे निवेदन तहसीलदार श्रीमती शोभा पुजारी यांना देऊन आपल्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या. या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अमर खानापुरे, राष्ट्रवादीचे रशीद शेख, नारायण लोखंडे, स्वयंप्रभा पाटील, दीपक राठोड, हणमंत राचट्टे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
किल्लारीत बाजारपेठ बंद
देशातील विविध भागातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत किल्लारी येथील व्यापाऱ्यांनी मंगळवारी बाजारपेठ बंद ठेवली. केंद्र शासनाने लागू केलेल्या नवीन कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे जागोजागी आंदोलने होत आहेत. दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देत येथील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवेदन आणि सोशल मीडियाद्वारे केलेल्या आवाहनास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत दिवसभर बाजारपेठ बंद ठेवली. दिवसभर बाजारपेठेत शुकशुकाट होता. याबाबत निवेदन सरपंच शैलाताई लोहार, उपसरपंच युवराज गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य गुंडप्पा बालकुंदे, शिवसेनेचे तालुका समन्वयक किशोर जाधव, तालुका उपप्रमुख किशोर भोसले, राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सचिव वल्लीखाँ पठाण, हारुन आतार, काँग्रेसचे महादेव बिराजदार आदींनी पोलिस प्रशासनास निवेदन दिले.
संपादन - सुस्मिता वडतिले