पंकजा मुंडेंवर बीड झेडपीत सत्ताधाऱ्यांची टोलेबाजी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

फॅब्रिकेटेड अंगणवाड्या तयार करणे हा तत्कालीन पालकमंत्र्यांचा अट्टहास होता; परंतु त्या वर्षात निधी खर्च करता आला नाही. त्यामुळे सक्षम नसल्याचे सिद्ध झाले, अशी टीका जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग साेनवणे यांनी पंकजा मुंडेंवर केली आहे.

बीड - जिल्हा परिषद ही शासन आणि ग्रामीण जनतेतील दुवा आहे. या माध्यमातून सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करून जिल्ह्यात विकासयोजना राबविण्यात येतील. बोलण्यापेक्षा कामातून विश्‍वास सार्थ ठरवू, असा विश्‍वास जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नूतन अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांनी बुधवारी (ता. 15) पदभार स्वीकाराल. यानंतर श्रीमती सिरसाट व उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला व नंतर पत्रकारांशी संवाद साधला. तत्पूर्वी मजूर संघाचे अध्यक्ष बन्सीधर सिरसाट, शिवाजी सिरसाट, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, जयसिंह सोळंके, गटनेते अजय मुंडे, वाल्मीक कराड, उद्धव दरेकर, रामप्रभू सोळंके आदींनी त्यांचा सत्कार केला.

हेही वाचा - राष्ट्रवादीचा वाटा पडला काँग्रेसच्या संजय दौंड यांच्या पदरात

यावेळी बजरंग सोनवणे म्हणाले, की मागील सरकारच्या काळात आणि झेडपीवर राष्ट्रवादीची सत्ता जिल्हा परिषदेच्या इमारतीला निधी उपलब्ध करून देणाऱ्या अजित पवार यांच्या हस्तेच नूतन इमारतीचे उद्‌घाटन होईल. पंचायत समित्यांची सुरू असलेली कामेही वेगाने पूर्ण करता येतील. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्यात येईल, असे बजरंग सोनवणे म्हणाले. जिल्हा परिषदेची रिक्त पदे भरण्यासाठीही पाठपुरावा करण्यात येईल. 

हेही वाचा - बीड झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांची अधिकृत निवड जाहीर

पंकजा मुंडेंवर निशाणा 
फॅब्रिकेटेड अंगणवाड्या तयार करणे हा तत्कालीन पालकमंत्र्यांचा अट्टहास होता; परंतु त्या वर्षात निधी खर्च करता आला नाही. त्यामुळे सक्षम नसल्याचे सिद्ध झाले. मंत्र्यांमुळेच निधी परत गेला, असा टोला बजरंग सोनवणे यांनी लगावला. सर्व सभापती राष्ट्रवादीचेच होतील आणि त्यावेळी मतांची संख्या 36 पर्यंत जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेवर सत्ता येणारच होती. महाविकास आघाडीमुळे प्रवास सुखकर झाला, असेही श्री. सोनवणे म्हणाले. 

हेही वाचा - अबब...बीडमध्येही चाईल्ड पोर्नोग्राफी!

लोकभावना समजून निर्णय घेऊ 
जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या आवारात महापुरुषांचे आणि नेत्यांचे पुतळे उभारण्याबाबत ठराव घेतलेले आहेत; मात्र लोकभावना समजून घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही बजरंग सोनवणे म्हणाले. दरम्यान, जिल्हा परिषदेचा जिल्हा बॅंकेत अडकलेला निधी परत मिळविण्यासाठी लढा देणार असल्याचेही सोनवणे म्हणाले. 

अपेक्षा नव्हती- सिरसाट 
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळेल, अशी अपेक्षा नव्हती; परंतु मंत्री धनंजय मुंडे व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवू असे शिवकन्या सिरसाट म्हणाल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bajrang Sonawane Criticizes Pankaja Munde At Beed