बीड झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांची अधिकृत निवड जाहीर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

राष्ट्रवादीच्या शिवकन्या सिरसाट यांनी अध्यक्षपदासाठी 32 मते घेऊन भाजपच्या डॉ. योगिनी थोरात यांचा पराभव केला. तर उपाध्यक्षपदासाठी जिल्हाध्यक्ष असलेले बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या संतोष हंगे यांचा पराभव केला होता.

बीड : जिल्हा परिषदेत सत्तांतर करून अध्यक्षपदी विजयी झालेल्या शिवकन्या सिरसाट व उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची सोमवारी (ता. 13) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये अधिकृत निवडी जाहीर करण्यात आल्या. शनिवारी (ता. चार) विशेष सभेत या निवडी झाल्या होत्या. 

जिल्हा परिषदेच्या जुन्या पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी शनिवारी (ता. 13) विशेष सभा घेण्यात आली; मात्र निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झालेल्या सदस्यांनी भाजपला मतदान केले म्हणून चार, तर गैरहजर राहिले म्हणून एक अशा पाच जणांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलेले आहे.

या सदस्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मताधिकाराची मागणी केली होती. त्याची सुनावणी सुरू असल्याने चार जानेवारीला निवडीची विशेष बैठक घ्यावी; परंतु निकाल 13 जानेवारीला जाहीर करावा, असे न्यायालयाचे आदेश होते. दरम्यान, शनिवारी अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीसाठी झालेल्या बैठकीत सत्तांतर करण्यात राष्ट्रवादीला यश आले. 

हेही वाचा -
प्रख्यात रंगकर्मी डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर यांचे निधन 

" कलाग्राम 'वर अवतरली उद्योगनगरी   

या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल  

मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   

राष्ट्रवादीच्या शिवकन्या सिरसाट यांनी अध्यक्षपदासाठी 32 मते घेऊन भाजपच्या डॉ. योगिनी थोरात यांचा पराभव केला. तर उपाध्यक्षपदासाठी जिल्हाध्यक्ष असलेले बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या संतोष हंगे यांचा पराभव केला होता. श्रीमती सिरसाट व श्री. सोनवणे यांना प्रत्येकी 32 मते मिळाली होती. तर श्रीमती थोरात व श्री. हंगे यांना प्रत्येकी 21 मते मिळाली होती.

हात उंचावून मतदान झाले; परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत निवडी जाहीर केल्या नव्हत्या. सोमवारी पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी या दोघांच्या निवडी जाहीर केल्या.

सोनवणेंनी पदभार घेतला 

उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी अधिकृत निवड जाहीर झाल्यानंतर काही वेळाने जिल्हा परिषदेत येऊन पदभार स्वीकारला. अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. अध्यक्षा शिवकन्या सिरसाट 17 तारखेला पदभार घेणार असल्याची माहिती आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Zila Parishad Election Bajrang Sonawane Shivkanya Shirsat News