अबब... बीडमध्येही चाईल्ड पोर्नोग्राफी! 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

बीड जिल्ह्यात पोर्नोग्राफीचा प्रकार उघड झाला असून, दोन व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.

बीड - जिल्ह्यात चाईल्ड पोर्नोग्राफीचा प्रकार उघड झाला आहे. जिल्ह्यातून असे दोन व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे उघड झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. याप्रकरणी सायबर क्राईम नुसार गुन्हा नोंद झाला असून तपास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगीतले. दरम्यान, 2018 च्या तुलनेत गुन्ह्यांत घट झाल्याची माहितीही हर्ष पोद्दार यांनी दिली.

सायबर क्राईममध्ये गंभीर असलेला चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकार बीडमध्ये प्रथमच उघडकीस आला आहे. अशा पद्धतीचे दोन व्हिडिओ बीडमधून साईट्‌सवर अपलोड झाल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने केले अजय देवगणने केले "तान्हाजी'त बदल 

संवेदनशील घटनांच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यात यश 
2018 च्या तुलनेत 2019 या वर्षांत गुन्ह्यांत घट झाल्याची माहिती हर्ष पोद्दार यांनी दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे उपस्थित होते. 2019 मध्ये नियमित गणपती, मोहरम, दसरा आदी सण-उत्सवांच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. विशेष म्हणजे या वर्षात लोकसभा आणि विधानसभा या दोन मोठ्या निवडणुकाही शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यात पोलिस प्रशासनाला यश आल्याचे श्री. पोद्दार यांनी सांगितले. याच वर्षअखेरीस अयोध्या निकाल, काश्‍मीरमधील 370 कलम, नागरिकत्व संशोधन कायदा आदी संवेदनशील घटना घडल्या. अपवाद वगळता जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

हेही वाचा - प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र सुरू करा, विक्रेत्यांची मागणी

पोलिसांचे चोख नियोजन कामाला आल्याचे पोद्दार म्हणाले. 2018 च्या तुलनेत सरत्या वर्षात (कंसातील आकडे हे गुन्ह्यांची झालेली घट आहेत.) खुनाचे प्रयत्न (43), दरोडा (10), जरबी चोरी (दोन), दंगे (94), फसवणूक अशा एकूण गुन्ह्यांची संख्या 461 ने कमी झाल्याचे ते म्हणाले. चोरीच्या प्रकरणांत मुद्देमाल हस्तगत करण्याचे प्रमाण 21 टक्‍क्‍यांवरून 31 टक्‍क्‍यांवर वाढले असून 267 प्रकरणांत मुद्देमाल फिर्यादीला परत देण्यात आला. आचारसंहिता आणि उत्सवाच्या काळात छापे टाकून शस्त्र जप्त करण्याची संख्या 32 ने वाढली असून दारूबंदी प्रकरणी 48 गुन्ह्यांची वाढ झाली आहे. 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

सामाजिक शांतता राखण्याच्या दृष्टीने विविध गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवायांमध्येही मोठी वाढ झाली असून 107 नुसार मागच्या वर्षीपेक्षा 3996 अधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. तर हद्दपारीच्या कारवायाही तब्बल अडीचशेनी वाढल्या आहेत. शक्ती पथकाने वर्षभरात 1770 कारवाया केल्या असून कवचच्या माध्यमातून रात्री उशिरा मदत मागणाऱ्या 10 महिलांना त्यांच्या घरी वा सुरक्षितस्थळी सोडण्यात आल्याचे श्री. पोद्दार म्हणाले. 

रिक्षांवरील कारवाई नव्याने सुरू करणार : कबाडे 
परवाना नसलेल्या आणि मुदतबाह्य रिक्षा भंगारात काढण्याची कारवाई पोलिसांनी हाती घेत 150 रिक्षे जप्त केले. त्याबाबत उपविभागीय परिवहन अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर त्यांच्याकडून पुढील कारवाई सुरू झाली आहे; मात्र या काळात परवान्यांची संख्या वाढून शासन महसूल वाढल्याचे विजय कबाडे म्हणाले. आणखी नव्याने कारवाईची मोहीम हाती घेण्यात येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Pornography In The Beed