खासगी हॉस्पिटलवर आता नायब तहसीलदारांचा वॉच

कोरोनासंदर्भातील उपाययोजनांबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे. यावेळी पोलिस अधीक्षक चैतन्य एस., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा.
कोरोनासंदर्भातील उपाययोजनांबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे. यावेळी पोलिस अधीक्षक चैतन्य एस., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा.

जालना - महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत येत असलेले ११ खासगी हॉस्पिटल येथे ८० टक्के खाटा हे कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या ११ खासगी रुग्णालयांत प्रत्येकी एक नायब तहसीलदार नियुक्त केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बुधवारी (ता. १५) दिली. 

नियुक्त केलेले नायब तहसीलदार कोरोनाबाधित रुग्णांना खाटा उपलब्ध होतात की नाही, हे पाहणार आहेत; तसेच कोरोनाबाधित रुग्णांकडून या योजनेअंतर्गत असलेल्या खासगी हॉस्पिटलला आगाऊ शुल्क घेता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्याला कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘सीएसआर’मधून आतापर्यंत एक कोटी ९५ लाख ३६ हजार ३८८ रुपयांचे साहित्य उपलब्ध झाले आहेत. यात पंधरा व्हेंटिलेटर, १८ हजार ५०० एन-९५ मास्क, अडीच हजार लिटर सॅनिटायझर, दोनशे बेड आदींचा समावेश आहे. 

शासकीय रुग्णालयातील डॉक्टर हे खासगी रुग्णालयात काम करणार नाही, असे आदेश दिले आहेत; तसेच सोमवारपासून (ता. १६) आयएमआयच्या डॉक्टर यापुढे कोविड रुग्णालयात सात दिवस सलग सेवा देणार आहेत, असे जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांनी सांगितले.  यावेळी पोलिस अधीक्षक चैतन्य एस., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा आदींची उपस्थिती होती. 

आरपीटीसीआर लॅब लवकरच सुरू 

जालना शहरातील आरपीटीसीआर लॅबमध्ये कोरोना नमुन्यांची प्राथमिक तपासणी केली जात आहे. या लॅबमध्ये लवकरच चाचणी होण्यास सुरवात होणार आहे. त्यासाठी ५५ लाख रुपयांच्या चार हजार टेस्ट किटची मागविण्यात आल्या आहेत. त्यात एक हजार टेस्ट किट मोफत मिळणार आहेत. त्यामुळे अँटीजेन टेस्ट किट व टेस्ट किट मिळून जवळपास साडे नऊ हजार कोरोना टेस्ट करण्याची तयारी करण्यात आल्याचे ही जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांनी सांगितले. 

अडीच हजार अँटीजेन टेस्ट किट 

कोरोनाबाधित रुग्णांचा शोध, तपासणी आणि उपचार यावर अधिक प्रभावी काम करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्यानुसार दोन हजार अँटीजेन टेस्ट किट उपलब्ध झाल्या. अजून अडीच हजार अँटीजेन टेस्ट किट मिळणार आहेत. त्यामुळे शहरात ३६ ठिकाणी सहा मोबाईल पथक जे स्वॅब घेत आहेत, त्या तपासणीसाठी याचा उपयोग होणार आहे, असे जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांनी सांगितले. 

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे स्थलांतर 

जिल्हा सामान्य रुग्णालय पुढील तीन ते चार दिवसांमध्ये जिल्हा महिला व बालरुग्णालय येथे स्थलांतरित करण्यात येणार आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आता कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर केले जाणार आहे. त्यासाठी १९८ नवीन खाटा उपलब्ध होणार आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांनी दिली. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com