रुग्ण वाढताहेत, मृत्यूसत्रही सुरूच ! घाबरु नका, अजूनही १०६० खाटा शिल्लक

दत्ता देशमुख
Sunday, 20 September 2020

बीड जिल्हा प्रशासनाचा दावा 

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येचा वेग वाढताच आहे. मृत्यूसत्रही सुरूच आहे. रविवारी (ता. २०) आणखी १५० रुग्णांची भर पडली. तर मागच्या २४ तासांत आणखी पाच कोरोनाग्रस्तांचे उपचारादरम्यान मृत्यू झाले. एकूण रुग्णसंख्या ८,३२९ तर मृत्यूंची संख्या २४३ झाली; मात्र जिल्हावासियांनी घाबरू नये, काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह प्रशासनाने केले.

आणखीही दवाखान्यांत १,०६० खाटा शिल्लक असून, कोविड केअर सेंटरमध्येही मोठ्या प्रमाणांवर खाटा उपलब्ध आहेत, अशी माहिती देण्यात आली. शिल्लक खाटांमध्ये ७७० खाटा ऑक्सीजनच्या तर १२४ खाटा व्हेंटीलेटरची सुविधा असणाऱ्या असल्याचे म्हटले आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

रविवारी आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ४३ रुग्णांचा समावेश आहे. अलीकडे आढळणाऱ्या रुग्णांमध्ये सहवासितांइतकेच नवीन रुग्णांचाही समावेश आहे. आतापर्यंत ८३२९ रुग्णांची संख्या झाली असून, यातील ५,२३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी ११७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या २,८५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २४३ मृत्यू झाले आहेत. यातील चार मृत्यूंची नोंद इतर जिल्ह्यांच्या पोर्टलवर झाली. मागच्या २४ तासांत नवीन पाच मृत्यू झाले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रुग्णालयांत ७९० रुग्ण 
जिल्ह्यात २,८५४ रुग्ण उपचार घेत असले तरी रविवारी सकाळपर्यंत केवळ ७९० रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. सर्वाधिक २८८ रुग्ण जिल्हा रुग्णालयात तर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात २२३ रुग्ण उपचार घेत आहेत. लोखंडीच्या कोविड रुग्णालयात २६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी सर्वाधिक ४४८ ऑक्सीजन सुविधा असलेल्या व ६७ व्हेंटीलेटरची सुविधा असलेल्या खाटा शिल्लक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा रुग्णालय, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, लोखंडीचे कोविड रुग्णालय, केज, परळी व गेवराईची उपजिल्हा रुग्णालये आणि आष्टी ग्रामीण रुग्णालय तसेच तेलगावच्या ट्रामा केअर सेंटर अशा पाच रुग्णालयांत एकूण १,०६० खाटा शिल्लक असून, यामध्ये ७७० खाटा या ऑक्सिजन सुविधा असलेल्या व १२४ खाटा व्हेंटीलेटरची सुविधा असलेल्या आहेत. १६६ सामान्य खाटाही शिल्लक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed administration claims 1060 beds are still left in hospitals