बीडकरांना दिलासा : संख्या घटली-रुग्णांची, मृत्यूची आणि तपासणीचीही! 

दत्ता देशमुख
Wednesday, 14 October 2020

सलग तिसर्या दिवशी रूग्णसंख्या शंभरीच्या खाली; आज ८० रुग्ण; उपचाराखालील रुग्णही घटले 

बीड : जिल्ह्यात ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात वेगाने वाढत असलेली कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृत्यूचे आकडेही अलिकडे काही प्रमाणात कमी होत आहेत. मंगळवारी (ता.१३) नवीन ८० रुग्णांची नोंद झाली. तर, नवीन दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. मात्र, याचवेळी रॅपीड अँटीजेन व थ्रोट स्वॅब तपासण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राज्यात मार्च महिन्याच्या अखेर कोरोनाग्रस्त रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्याचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाले. जिल्ह्यात लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी व पालन करण्यात आले. परिणामी सुरुवातीचे तीन महिने जिल्ह्याच्या हद्दीतून कोरोनाला बाहेर ठेवण्यात यश आले. मात्र, हळुहळू लॉकडाऊन व जिल्ह्याच्या सीमा खुल्या होताच कोरोनाने जिल्ह्यात प्रवेश केला. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नेहमीच नियमित आढळणाऱ्या रुग्णांची संख्या दोनशेच्या घरात असे. रॅपीड अँटेजन तपासणी मोहिमेत हा आकडा अगदी चारशेपर्यंतही गेला. मात्र, मागच्या चार दिवसांत हळुहळू रोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसत आहे. मागच्या चारपैकी तीन दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या शंभरीच्या आत आहे. मंगळवारी (ता. 13) ही संख्या पुन्हा घटून ८० वर खाली आली. रोजच अधिक असलेली मृत्यूंची संख्याही घटून दोनवर खाली आली. आतापर्यंत ३५३ मृत्यू झाले असून यातील चार मृत्यूंची नोंद इतर जिल्ह्यांच्या पेार्टलवर झाली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उपचाराखालील रुग्णही घटले 

दरम्यान, एकेकाळी उपचाराखालील रुग्णांची संख्या तीन हजारांच्या घरात गेली होती. त्यामुळे अपुरे मनुष्यबळ, तज्ज्ञांची अपुरी संख्या यामुळे आरोग्य विभागावर मोठा ताण निर्माण झाला होता. मात्र, आता दिवसेंदिवस कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक व वाढणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. सध्या 1453 रुग्ण उपचाराखाली आहेत. आतापर्यंतची रुग्णसंख्या 11709 झाली असून 9903 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Corona patients and deaths and check-ups Nomber reduced