कामात कुचराई; नऊ वॉर्डबॉय थेट घरी, बीड सीएसची कारवाई!

दत्ता देशमुख
Tuesday, 13 October 2020

बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सकांची कारवाई 

बीड : कोविड रुग्णांवरील उपचार सुरू असलेल्या वॉर्डात कामात टंगळमंगळ करणाऱ्या नऊ वॉर्डबॉयवर सोमवारी (ता. १२) सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी याबाबतचे आदेश काढले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील विविध वॉर्डांत उपचार करण्यात येत आहेत; तसेच यासाठी कोविड केअर सेंटरदेखील उभारण्यात आले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचारासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून डॉक्टर, नर्स व वॉर्डबॉय अशी पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. रुग्णसंख्येच्या प्रमाणात पदे भरली गेली आहेत. दरम्यान, कोरोनाग्रस्तांच्या वॉर्डमध्ये स्वच्छतेची जबाबदारी असलेले नऊ कर्मचारी वेळेवर न येणे, स्वच्छता न करणे, न सांगता गैरहजर राहणे असे प्रकार करीत असल्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांना प्राप्त झाला. कोरोनाग्रस्त वॉर्डात उपचाराइतकेच महत्त्व स्वच्छतेला आहे. मात्र, त्या कामातच हलगर्जीपणा करण्याचा प्रकार समोर आल्याने या नऊ वॉर्डबॉयची सेवा समाप्तीचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांनी सोमवारी दिले.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

बीड मध्ये नवीन ७८ रुग्णांची वाढ; ९,७१४ रुग्ण कोरोनामुक्त 

मागच्या काळात नियमित आढळणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सोमवारी (ता. १२) कमालीची घट झाल्याचे समोर आले. वास्तविक तपासणीचा आकडाही कमी झाला आहे. सोमवारी ७८ नवीन रुग्णांची वाढ झाली. 
मात्र, मृत्यूंचे सत्र सुरूच असून, आणखी सहा कोरोनाबळींची नोंद झाली. जिल्ह्यातील आतापर्यंतची रुग्णसंख्या ११,६२९ एवढी झाली आहे. तर सोमवारी उपचार घेणारे १३४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९,७१४ झाली आहे. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १५६४ एवढी आहे. दरम्यान, रविवार-सोमवार या दोन दिवसांत आणखी सहा कोरोनाबळींची नोंद झाली. आतापर्यंत ३५१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यातील चार मृत्यूंची नोंद इतर जिल्ह्यांत झाली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उपचार घेणाऱ्यांची संख्याही घटली 
मागच्या दोन महिन्यांत जिल्ह्यात रोजच झपाट्याने कोरोनाग्रस्तांची वाढ होत होती. रोज कोरोनामुक्त रुग्ण होत असले तरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या तीन हजारांच्या घरात पोचली होती. मात्र, आता ही संख्या कमी होऊन १,५६४ एवढी झाली. 

बलात्कारी कोरोनाग्रस्त फरार 
नातलग मुलीवर बलात्कार करणारा फरार आरोपी अटकेनंतर कोरोनाबाधित आढळला होता. या २५ वर्षीय आरोपीवर शिरूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी (ता. १२) पहाटे त्याने पळ काढला. ता. तीन ऑक्टोबरला त्याला अटक केली होती. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed CS takes action against nine non-working ward boys