घरीच अभ्यास अन् पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक,शेतकऱ्याच्या मुलीचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer Daugther Shraddha Shinde Crack UPSC

घरीच अभ्यास अन् पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक,शेतकऱ्याच्या मुलीचे यश

बीड : बीडमध्ये घरी राहूनच अभ्यास केला आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशाला गसवणी घालण्याची किमया शेतकरी कन्येने केली आहे. श्रद्धा नवनाथ शिंदे हिने युपीएससी (UPSC) च्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत ३६ वा रँक मिळविला आहे हे विशेष. तालुक्यातील लोणी शहाजानपूर येथील अल्पभूधारक शेतकरी असलेले नवनाथ शिंदे मुलांच्या शिक्षणासाठी बीडलाच राहतात. त्यांनी कापूस खरेदी-विक्रीचा जोडधंदाही सुरु केलेला आहे. पत्नी आशा शिंदे गृहिणी. मुलगी श्रद्धा व विशाल आणि वैभव ही दोन मुले. विशाल फार्मसी तर वैभव विज्ञानात पदवीधर आहे. थोरल्या श्रद्धाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडलाच झाले. नंतर तिने औरंगाबाद (Aurangabad) येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रीकल इंजिनीअरींगचे शिक्षण पूर्ण करुन २०१८ साली अभियांत्रिकीची पदवी हाती घेतली. (Beed Farmer Daughter Shraddha Shinde Crack UPSC Engineering Service In First Attempt)

हेही वाचा: Mahadev Jankar : महादेव जानकर यांना कोरोनाची लागण

त्यानंतर तिने थेट दिल्ली गाठली व सहा महिने शिकवणी केली. त्यानंतर २०१९ च्या अखेरीला केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) भारतीय अभियांत्रिकी सेवा (आयईएस) परीक्षेसाठी जाहीरात प्रसिद्ध केली. श्रद्धा शिंदेने परीक्षेचा फॉर्म भरला आणि जानेवारी २०२० प्रिलिमनरी परीक्षाही दिली. पहिल्याच प्रयत्नात आणि पहिल्याच परीक्षेत तिला यशही मिळाले. त्यानंतर तिने घरीहूनच मुख्य परीक्षेचीही तयारी केली. ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल डिसेंबर महिन्यात लागला. यातही तिला यश मिळाले. नंतर मार्च २०२१ मध्ये तिची मौखिक परीक्षा (मुलाखत) झाली. या सर्व परीक्षेचा एकत्रित निकाल रविवारी (ता. नऊ) प्रसिद्ध झाला. त्यात श्रद्धाने ३६ वा रँक मिळविला आहे. युपीएससीतून आयएएस, आयआरएस, आयपीएस सेवेत जाणाऱ्यांची जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या मोठी आहे. मात्र, मुलींमधून भारतीय अभियांत्रिकी सेवेत जाणारी श्रद्धा जिल्ह्यातील पहिलीच आहे. तिने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून आई आशा व शेतकरी वडिल नवनाथ शिंदे यांच्या अपेक्षेला चार चांद लावले. भविष्यात तिची सहायक कार्यकारी अभियंता पदावर नेमणूक होईल.

हेही वाचा: UPSC नं अनेक पदांसाठी जाहीर केली भरती

जिथे शिक्षण तिथेच नोकरीची ऑफर पण..

२०१८ साली इलेक्ट्रीकल इंजिनीअर ही पदवी हातात घेताच तिने शिक्षण घेतलेल्या औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने तिला सॉफ्टवेअर इंजिनीअर पदावर नोकरीची ऑफर केली. मात्र, तिला भारतीय अभियांत्रिकी सेवेत जायचे होते. त्यामुळे तिने नम्रपणे नकार देत युपीएससीची तयारी केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :UPSC
loading image
go to top