बीड लोकसभा निवडणूक खर्चात अनियमितता अकरा बड्या अधिकाऱ्यांवर ठपका

दत्ता देशमुख
Thursday, 29 October 2020

 • - १६ कोटी ५३ लाखांपैकी आठ कोटी नऊ लाखांनाच मंजूरी
 • - चौकशी समितीकडून अधिकाऱ्यांवर ठपका. 
 • सव्वा आठ कोटी रुपये कपात करण्यात आल्याने शासन तिजोरीतील आठ कोटी रुपये वाचणार. 

बीड : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे झाली. मात्र, तक्रारी व चौकशीनंतर यातील सव्वा आठ कोटी रुपये कपात करण्यात आल्याने शासन तिजोरीतील आठ कोटी रुपये वाचणार आहेत. या समितीने खर्चात कपात करण्यासह बड्या अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवला आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
निवडणुकीच्या अनुषंगाने नऊ वेगवेगळ्या कामांसाठी सोळा कोटी त्रेपन्न लाख रुपये खर्च दाखवण्यात आला होता. त्यातला आठ कोटी अठरा लाख रुपये खर्च कमी करण्यात आला असून आता फक्त प्रशासनाला आठ कोटी नऊ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मंडप, जेवण, झेरॉक्स अशा बाबींवर वारेमाप खर्चाच्या तक्रारी निवडणुक आयोगाकडे करण्यात आल्या. बारा मुद्यांवर आधारित ही चौकशी झाली. यात पाच सदस्य असलेल्या चौकशी समितीने दुसऱ्या एका तक्रारीत क्लीन चिट दिली होती. तर, पुन्हा तक्रारीनंतर नियुक्त केलेल्या सहा सदस्यीय समितीने या खर्च प्रकरणात ११ अधिकाऱ्यांना दोषी धरले. विविध नऊ कामांत १६ कोटी ५३ लाख खर्च दाखविण्यात आला होता. त्यातील केवळ आठ कोटी नऊ लाख ७५ हजार रुपये खर्च समितीने मान्य केला आहे. त्यामुळे आठ कोटी १८ लाख रुपये वाचल्याचे तक्रारकर्ते अॅड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या अधिकाऱ्यांवर समितीने ठेवला ठपका
निवडणुक खर्चातील अनियमिततेप्रकरणी चौकशी करणाऱ्या समितीने ११ अधिकाऱ्यांना दोषी ठरविले आहे. यामध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण कुमार धरमकर, जिल्हा पुरवठा अधिकारी हरिश्चंद्र गवळी, शोभा ठाकूर (माजलगाव), प्रभोदय मुळे (बीड), नम्रता चाटे (पाटोदा), शोभा जाधव (अंबाजोगाई), गणेश महाडिक (परळी वैजीनाथ) या उपविभागीय अधिकाऱ्यांसह संगीता चव्हाण (गेवराई), प्रतिभा गोरे (माजलगाव), अविनाश शिंगटे (बीड), हिरामण झिरवाळ (आष्टी) मेंडके (केज), बिपीन पाटील (परळी) या सहा तहसीलदारांचाही ठपका ठेवलेल्यांमध्य समावेश आहे. 

कामाचे नाव    शिफारस केलेली रक्कम    कमी केलेली/बचत झालेली रक्कम

 • वेब कास्टिंग - दोन कोटी २० लाख -    एक कोटी ८० लाख. 
 • जीपीएस    -  ४७ लाख ९७ हजार -    १९ लाख १८ हजार.
 • मंडप, विद्युत  - सहा कोटी ६० लाख -    तीन कोटी ४५ लाख.
 • व्हिडीओ कॅमेरा - एक कोटी ९३ लाख -    एक कोटी २० लाख.
 • चहा, नाष्टा, भोजन - दोन कोटी -    एक कोटी आठ लाख.
 • संगणक, सीसीटीव्ही - एक कोटी ६१ लाख -२७ लाख ९३ हजार.
 • वाहन पुरवठा  -  ६८ लाख    - तीन लाख ५२ हजार.
 • हमाल, मजूर पुरवठा - ५१ लाख -    १३ लाख.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed LokSabha election expenses Irregularities inquiry committee blames eleven officer