विष प्राशन केलेल्या युवकाचा मृत्यू; नातेवाईकांनी मृतदेह आणला पोलीस चौकीसमोर, पुढे झाले असे की. 

रामदास साबळे 
Thursday, 3 September 2020

उच्चस्तरीय तपासणीनंतर मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नातेवाईक पोलिस ठाण्यात.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील आडस गावातील ही घटना. 

केज (बीड) : तालुक्यातील एकवीस वर्षीय तरूणाने रागाच्या भरात तणनाशक प्राशन केल्याची घटना बुधवार (ता.०२) रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. त्याच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री साडेनऊ वाजता मृत्यू झाला. मयत झालेल्या तरूणाचे नाव राजेश बालासाहेब काळे असल्याची माहिती आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

तालुक्यातील आडस येथील राजेश बाळासाहेब काळे (वय-२१) हा तरूण ट्रॅकर चालक होता. तो ज्या ट्रॅकर मालकाच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून कामास होता; त्या मालकासोबत त्याचे बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आर्थिक देण्या-घेण्यावरून वाद झाला होता. त्यामुळे झालेल्या भांडणाचा मनात राग आल्याने त्याने आडस शिवारातील एकबुर्जी शेतात जाऊन तणनाशक फवारणीचे औषध प्राशन केले. त्यास उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना रात्री साडेनऊ वाजता उपचारादरम्यान त्या तरूणाचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून गुरूवारी दुपारी दीड वाजता मृतदेह आडस येथे आणून पोलीस चौकी समोर ठेवण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी गर्दी करत एकुलत्या एक मुलांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या आरोपीवर कारवाई करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली.

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन  

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुरेखा धस या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक ऋषिकेश आडसकर व तलाठी बापुसाहेब देशमुख, बाळासाहेब देशमुख व रमेश ढोले यांनी मयत तरूणाच्या नातेवाईकांच्या भावना व म्हणणे ऐकून घेतले.

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन  

यावेळी पोलीस सुरेखा धस यांनी संबधीतावर योग्य ती कारवाई करून तात्काळ ताब्यात घेतल्याचे आश्र्वासन दिल्यानंतर दोन वाजता मृतदेह पोलीस चौकी समोरून हलविण्यात आला. दुपारी तीन वाजता आडस येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी दिली आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed news Relatives brought the body in front of the police station for arrest accused