Crime : शिक्षक खून प्रकरणातील मास्टर माईंड पोलिसांच्या ताब्यात!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

19 सप्टेंबर या दिवशी हॉटेलमध्ये चहा पित सय्यद साजेद या शिक्षकाचा धारदार शस्त्राचे वार करुन खून करण्यात आला होता. या प्रकरणी 17 जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

बीड : शिक्षक खून प्रकरणातील मास्टर माईंड आणि विविध 26 गुन्हे दाखल झालेला मोस्ट वाँटेड गुज्जर खान याच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आले. पोलिस दलाची चार पथके मागच्या २० दिवसांपासून त्याच्या मागावर होती. सोमवारी (ता.7) मध्यरात्री बीडजवळ त्याला अटक केली असून सोमवारपर्यंत (ता.14) त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. 

19 सप्टेंबर या दिवशी हॉटेलमध्ये चहा पित सय्यद साजेद या शिक्षकाचा धारदार शस्त्राचे वार करुन खून करण्यात आला होता. या प्रकरणी 17 जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यापैकी 11 जणांना अटक करण्यात आली होती. हा खून गुज्जर खान याच्या टोळीने केल्याचे समोर आले होते. परंतु, टोळीचा म्होरक्या गुज्जर खान पोलिसांना हुलकावणी देत होता. गुज्जरवर या खुनासह इतर 26 गंभीर गुन्हे नोंद आहेत.

वेगवेगळे फोन नंबर वापरून आणि ठिकाणे बदलत तो मागील 20 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो देशाबाहेर जाण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज बांधत त्यादृष्टीनेही तपास करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले. त्याच्या मागावर पोलिसांची चार पथके होती. त्याला सोमवारी रात्री दरोडा विरोधी पथकाने बीड जवळील चऱ्हाटा फाट्यावर अटक केली. यावेळी त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन राऊंड ताब्यात घेतले आहेत.

गुज्जर खान याला सोमवार (ता.14) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत, दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख गजानन जाधव उपस्थित होते.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ; केंद्रीय कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड

- Vidhan Sabha 2019 : शिवसेनेसमोर बंडखोरांचे आव्हान!

- महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मितालीचंच 'राज'!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Police arrested to the mastermind of teacher murder case