आईवड़ीलांना वाऱ्यावर सोडाल तर सावधान! आता तीस टक्के पगार होणार कपात! 

विकास गाढवे
Thursday, 12 November 2020

  • अहमदनगरप्रमाणे लातूर जिल्हा परिषदेचा ठराव; आचारसंहितेची चर्चेला बाधा.
  •  
  • जिल्हा परिषदेचा ठराव तीस टक्के पगार आई वडीलांच्या खात्यात जमा होईल. 

लातूर : पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेत मंगळवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. आचारसंहितेमुळे अनेक विषय, चर्चा व आश्वासनांना बाधा पोचली. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांना वारंवार आचारसंहितेची आठवण सदस्यांना करून द्यावी लागली. यातच आईवडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या शिक्षकांचे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या धर्तीवर सर्वेक्षण करून त्यांची तीस टक्के पगार आईवडिलांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आगळावेगळा ठराव सभेत मंजूर झाला. या कार्यात जिल्हा परिषद राज्याला प्रेरणादायी काम करेल, असा विश्वास अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी ठराव मंजुरीची घोषणा करताना व्यक्त केला. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्हा परिषद सदस्य मंचकराव पाटील यांनी ऑनलाइन सहभागी होत हा ठराव मांडला होता. आई-वडिलांच्या आजारपणाचे कारण पुढे करून शिक्षकांकडून सोयीच्या ठिकाणी बदली करून घेतात. विविध कारणांसाठी आई-वडिलांचा दाखला देतात. मात्र, ते खरेच त्यांना सांभाळतात का, याची खात्री केली जात नाही. उतारवयात काळजी घेत जात नसल्याने आई-वडिलांची कसरत होत आहे. यामुळे सभेत हा ठराव मंजूर करून कार्यवाही करण्याची मागणी पाटील यांनी केली होती. त्यांच्या मागणीला बहुतांश सदस्यांनी पाठिंबा दाखवला. श्री. गोयल यांनीही यासाठी सिनिअर सिटीझन कायद्यानुसार स्वतंत्र प्राधिकरण असल्याचेही सांगितले. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचाही जिल्हा परिषद आवारात पुतळा उभारण्याची मागणी सदस्यांनी केली आणि तेव्हापासून आचारसंहितेचा विषय ऐरणीवर येऊ लागला. शेवटी आचारसंहिता संपल्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा बोलावून यावर निर्णय घेण्याचे श्री. केंद्रे यांनी जाहीर केले. त्यानंतर नारायण लोखंडे यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशात ७० : ३० फॉर्म्युला रद्द केल्याबद्दल पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. असा ठराव मांडता येत नसल्याचे श्री. गोयल यांनी सांगितल्यानंतरही या ठरावाला पुढील सभेचा पर्याय देण्यात आला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पुढील सभा व वैयक्तिक चर्चेचे पर्याय 
श्री. गोयल यांना सचिवांच्या व्हीसीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याची घाई होती तर श्री. केंद्रे यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमाला जाण्याची गडबड होती. दोघांची चुळबुळ सुरू होती. मात्र, सदस्यांकडून प्रश्नांचा भडिमार संपत नव्हता. गोयल यांनी अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांना आचारसंहितेचा बडगा दाखवला तर निरोप पाठवूनही सदस्य आवरते घेत नसल्याने केंद्रे यांची पंचाईत झाली. यातच गोयल अध्यक्षांची परवानगी घेऊन निघून गेले. त्यानंतरही बराचवेळा सदस्यांचे प्रश्न सुरू होते. आचारसंहितेचे कारण पुढे आलेल्या काही प्रश्नांना पुढील सभेचा तर काही प्रश्नांवर कक्षात तसेच वैयक्तिक चर्चेचा पर्याय देण्यात आले. पर्याय देऊनही महेश पाटील वगळता इतर सदस्यांनी माघार घेतली नाही. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware parents are ignored otherwise 30 percentage salary will be deducted Latur ZP decision