सावधान! व्हॉट्सअप स्टेट्सवर पैशांचे आमिष, लिंक व्हायरल, सायबर क्राईमचा धोका  

उमेश वाघमारे 
Thursday, 29 October 2020

शॉटकटने पैसे कमविण्याच्या नादात अनेक जण त्याला बळी पडतात. आणि स्वतःची व्यक्तीगत माहिती शेअर करतात. यातूनच सायबर क्राईमाचा जन्म होतो.

जालना : अलीकडच्या काळात प्रत्येकाच्या हाती स्मार्ट फोन आलेले आहेत. त्यामुळे मोबाइल नेटचा वापर ही झपाट्याने वाढला आहे. परिणामी इंटरनेटच्या दुनियेत गुन्हेगारांकडून नवीन प्रलोभने देऊन गुन्हे करण्याची नवीन पद्धती अवलंब करत असतात. मागील काही दिवसांपासून अशी एक लिंक व्हॉटस्अॅपवर झपाट्याने शेअर होत आहे. व्हॉटस्अॅपवर स्टेट्स ठेवून पैसे कमविण्याचे आमिष दाखविले जात आहे. त्यासाठी व्यक्तिगत काही माहिती ही एका लिंकव्दारे भरून घेतली जात आहे. विशेष म्हणजे अनेक जणांनी या लिंकवर माहिती भरून व्हॉटस्अॅप स्टेट्स ठेवल्याचे प्रकार ही घडले आहे. मात्र, या बाबत सायबर सेल मात्र अनभिज्ञ आहे, हे विशेष.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

इंटरनेटच्या माध्यमातून अनेकदा वेगवेगळे प्रलोभन देऊन अनेकांची लूट होते. मात्र, तरी देखील शॉटकटने पैसे कमविण्याच्या नादात अनेक जण त्याला बळी पडतात. आणि स्वतःची व्यक्तीगत माहिती शेअर करतात. यातूनच सायबर क्राईमाचा जन्म होतो. हल्ली प्रत्येक जण आपल्या मोबाइलवरून ऑनलाइन पेमेंट ट्रांसफर करण्यासाठी बॅंक लिंक असलेल्या मोबाइल नंबरशी विविध अॅपची जोडणी करतात. तसेच तोच नंबर नियमित वापरात असल्याने त्यावर व्हॉटस्अॅप ही सुरू करतात. त्यामुळे व्हॉटस्अॅपवर अनेक विविध प्रलोभने देणाऱ्या पोस्ट लिंकसह शेअर होत असतात. मात्र, आता व्हॉटस्अॅपवर एक नवीन लिंक शेअर होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ही लिंक ओपन केल्यानंतर व्हॉटस्अॅप स्टेटसमधून पैसे कमवू शकता अशी जाहीरात देत स्वतःची व्यक्तिगत माहिती भरण्यासाठी सांगितले जाते. या लिंकमध्ये महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांची नावे फिड केलेली आहेत. स्वतःचा मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी भरल्यानंतर जिल्हा सिलेक्ट करण्यास सांगितले जाते. त्यानंतर व्हॉटस्अॅप स्टेटस शेअर करण्यासाठी एक आयकॉन येतो. शेअर केलेले स्टेटस जर तीस पेक्षा अधिक जणांनी पाहिले तर ५०० रुपयांपर्यंत कमाई करता येईल असे त्या लिंकवर नमूद केले आहे. या प्रलोभनाला आतापर्यंत हजारो जण बळी पडले आहेत. त्यामुळे हा सायबर क्राईमाची नवी पद्धती तर नाही ना? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, या संदर्भात सायबर सेलच अनभिज्ञ असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अशा लिंकवर व्यक्तिगत माहिती भरताना खात्री करा, अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे, यात शंका नाही. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

आतापर्यंत अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. जर बॅंक डिटेल, कार्ड डिटेल घेतले तर बॅंक खात्यातून पैस जाऊ शकतात. बॅंकेतून पैसे काढून फसविल्या तो सायबर क्राईमचा गुन्हा होऊ शकतो. परंतु त्यांचे काही प्रमोशन अॅक्टीव्हीटी असेल तर सांगता येणार नाही. 
-विनायक देशमुख, पोलिस अधीक्षक, जालना.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware WhatsApp states money lure link viral Jalna news