Bird Flu:'बर्ड फ्लूमुळे धोका वाढला, राज्यात लवकरच अलर्ट'

ऑनलाईन सकाळ टीम
Monday, 11 January 2021

देशातील बऱ्याच राज्यांमध्ये बर्ल्ड फ्ल्यूने थैमान घातलं असून महाराष्ट्रातही त्याचा शिरकाव झाला आहे.

जालना : मागील काही दिवसांपासून राज्यात बर्ड फ्ल्यूचा प्रभाव वाढताना दिसत आहे. यामुळे कोरोनाची साथ सुरु असताना दुसरा आजार पसरणे धोकादायक असल्याचं सांगितलं जातंय. बर्ड फ्लू खूपच धोकादायक असून याचा मृत्यूदर हा 10 ते 12 टक्क्यांएवढा आहे. यामुळे राज्यात हायअलर्ट घोषित करणं गरजेचं असल्याचं मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडलं आहे.

जालना येथे टोपे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. “देशातील बऱ्याच राज्यांमध्ये बर्ल्ड फ्ल्यूने थैमान घातलं असून महाराष्ट्रातही त्याचा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यात शेकडो कावळे या बर्ड फ्लूने मृत पावले आहेत. पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरणाऱ्या या आजाराचा मानवी शरिरातही संसर्ग होतो. बर्ड फ्लूचा मृत्यूदर 10 ते 12 टक्के आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट घोषित करणे गरजेचे असल्याचं मत टोपे यांनी मांडले आहे.

 800 कोंबड्यांचा मृत्यू
परभणी जिल्ह्यात मुरुंबा गावात बर्ड फ्ल्यूमुळे तब्बल  800 कोंबड्यांचा मृत पावल्याचे वृत्त आहे. या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ माजवली आहे. या सर्व मृत कोंबड्या एकाच पोल्ट्री फार्ममधील आहेत. या घटनेनंतर परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी इतर कोंबड्यांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले होते. बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याचं महाराष्ट्र देशातील आठवं राज्य बनलं आहे.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक
महाराष्ट्रात बर्ड फ्ल्यूची प्रकरणं समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेत या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर या आजाराची तीव्रता आणि एकूण परिस्थिती समोर येईल.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bird Flu Increases Risk, Very Soon High Alert In State Bird Flu Update