esakal | भाजप-शिवसेनेची महापालिकेतील युती तुटली-आमदार अतुल सावे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

भाजप-शिवसेनेची महापालिकेतील युती तुटली-आमदार अतुल सावे

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहरासाठी 1,680 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. त्याचे टेंडर निघाले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच डिसेंबररोजी अध्यादेश काढून योजनेला स्थगिती दिली. यामुळे भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी शुक्रवारी (ता.13) राजीनामा दिला. महापालिकेतील या पाणी पुरवठा योजनेचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यावरूनच शिवसेनेसोबतची युती भाजपने तोडली असून आता भाजप महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याची माहिती शनिवारी (ता.14) आमदार अतुल सावे व शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


शुक्रवारच्या राजीनाम्या नाट्यानंतर शनिवारी किशनचंद तनवाणी, अतुल सावे यांनी जिल्हा कार्यालयात सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महापौर नंदकुमार घोडेले यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. भाजपचे सर्व नगरसेवक व महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष तनवाणी यांच्याकडे आपले राजीनामे सुर्पूत केले असल्याचे श्री. सावे यांनी सांगितले. 

आणखी वाचा - 'देश वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागेल'

महापौर हे युतीच्या मतावर निवडून आले

राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीत पुढील भूमिकेविषयी चर्चा करण्यात आली. हे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येतील व येत्या दोन दिवसात याविषयी बैठकी होणार आहे. उपमहापौरांनी महापौरांकडे राजीनामा द्यावा, अशा आशयाच्या काही बातम्या आल्या होत्या. त्यावर सोमवारी (ता.16) उपमहापौरांचा राजीनामा महापौरांकडे दिला जाणार आहे. तत्पूर्वी महापौर हे युतीच्या मतावर निवडून आले त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असेही श्री. तनवाणी यांनी सांगितले. 

आणखी वाचा - 'माफी मागायला माझं नावा राहुल सावरकर नाही'

शिवसेनेने मांडावा संभाजीनगरचा प्रस्ताव 
शिवसेनेतर्फे नेहमी शहराचा उल्लेख संभाजीनगर केला जातो. माजी खासदार चंद्रकांत खैरे हे आवर्जून संभाजीनगरचा उल्लेख करतात. यामुळे शिवसेनेने महापालिकेत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मांडावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. यासह जिल्हा परिषदेतही ठराव मांडावा, अशी मागणीही यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केली. 

भारत बचाओ, भारत बचाओ! रॅली काढत काँग्रेस उतरलं दिल्लीच्या मैदानात


आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत नाही! 

शिवसेनेच्यावतीनेनेहमीच आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो, असे सांगण्यात येत होते. मात्र, आम्ही थेट राजीनामा देतो, ते खिशात घेऊन फिरत नाही, असा टोला माजी महापौर भगवान घडमोडे यांनी लगावला. यावेळी उपमहापौर विजय औताडे, गटनेते प्रमोद राठोड, राजू शिंदे, कचरु घोडके व 23 नगरसेवक 6 अपक्ष नगरसेवक उपस्थित होते.