अरेरे! पतंग काढताना 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

तो रविवारी सायंकाळी मंदिराजवळच्या भिंतीवर चढून पतंग काढत होता. अचानक तोल जाऊन कोसळल्यामुळे त्याच्या डोक्‍याला गंभीर इजा झाली. त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण...

औरंगाबाद : पतंग काढताना मंदिराच्या भिंतीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या 14 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. एक) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हर्सूल परिसरात घडली. 

शुभम राजू हजारे (रा. मारूतीनगर, मयूर पार्क) असे मृताचे नाव आहे. तो रविवारी सायंकाळी मंदिराजवळच्या भिंतीवर चढून पतंग काढत होता. अचानक तोल जाऊन कोसळल्यामुळे त्याच्या डोक्‍याला गंभीर इजा झाली. त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

इडलीचे पैसे, चटणी मागितली म्हणून मारहाण

औरंगाबाद : इडलीचे पैसे व चटणी मागितल्यावरून दोन गटात मारहाण झाली. हा प्रकार शनिवारी (ता. 30) नोव्हेंबरला लक्ष्मण चावडी मोंढा रोड येथे घडला. याप्रकरणी दोन्ही गटांकडून दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार जिन्सी व क्रांती चौक ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. राजू हरिआप्पा वैद्य यांचे लक्ष्मण चावडी येथे वैष्णवी टी ऍण्ड चाट भांडार आहे. तेथे फजर पठाण गेले व त्यांनी इडली घेतली.

हेही वाचा - त्याने असा चिरला बायकोचा विळ्याने गळा

वैद्य यांनी पैशांची मागणी केल्यानंतर शिवीगाळ करून इतर काही लोक जमा केले व गोंधळ घालीत मारहाण केली, अशी तक्रार वैद्य यांनी दिली. याच घटनेत फजर पठाण यांच्या आत्याकडून तक्रार देण्यात आली. त्यानुसार फजर पठाण भजे खाताना मंगेश वैद्य यांना चटणी मागितल्यानंतर त्यांनी पठाण यांना शिवीगाळ केली व इतर लोक बोलावून मारहाण केली. या दोन्ही तक्रारीनुसार गुन्ह्याची नोंद झाली.

व्यापाऱ्याला मारहाण करून हिसकावला मोबाईल, सोनसाखळी

औरंगाबाद : तरुण व्यापाऱ्याला मारहाण करून लुटणाऱ्या दोन संशयितांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (ता. 30) करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मदेव विश्‍वकर्मा (वय 31, रा. शिवशाहीनगर, रेल्वेस्थानकाजवळ, मुकुंदवाडी) यांनी याबाबत तक्रार दिली.

क्लिक करा - त्या तरुणीचा मृत्यू अतिप्रसंग झाल्यामुळेच

तक्रारीनुसार, श्री. विश्‍वकर्मा यांचे स्लाईडिंग विंडोचे दुकान आहे. शनिवारी दुकान बंद करून रात्री नऊच्या सुमारास ते घरी जात होते. यादरम्यान त्यांना घरून कॉल आल्याने त्यांनी दुचाकी थांबविली व कॉल घेऊन बोलत होते. त्यावेळी पंचविशीतील दोघे त्यांच्याजवळ आले. त्यांनी पुडी खाण्यासाठी पैशांची मागणी केली. विश्‍वकर्मा यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांनी मारहाण करून मोबाईल, चांदीचे कडे, सोन्याची अर्धी साखळी हिसकावून पोबारा केला.

काहीही - मोबाईल खेळायला न दिल्याने मुलगा घर सोडून गेला

याप्रकरणी विश्‍वकर्मा यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. दरम्यान, उपनिरीक्षक राहुल बांगर व इतर कर्मचाऱ्यांनी संशयित कैलास हिवाळे व त्याचा साथीदार अमित ऊर्फ बबुवा चौधरी यांना ताब्यात घेत झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडील मोबाईल व दुचाकी जप्त केली. त्यांची चौकशी केली असता आपण गुन्हा केला, अशी कबुली त्यांनी दिली.

चक्क - पोलिसावरच बलात्काराचा गुन्हा

ही कारवाई प्रभारी पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, उपनिरीक्षक राहुल बांगर, सहायक फौजदार कौतिक गोरे, पोलिस शिपाई कैलास काकड, अस्लम शेख, सुनील पवार, मनोहर गिते, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, संतोष भानुसे, सुधाकर पाटील यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boy Dead While Taking Kite From Wall in Aurangabad