वनविभागाचा गलथान कारभार, हरणाचा गेला जीव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

वन विभागाच्या गलथान कारभारामुळे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाचा वेळेत उपचार न झाल्यामुळे शनिवारी (ता. 16) सिल्लोड येथे मृत्यू झाला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी सूचना देऊनही बारा तास या विभागाचे कर्मचारी या गावात फिरकलेच नाहीत.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : वन विभागाच्या गलथान कारभारामुळे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाचा वेळेत उपचार न झाल्यामुळे शनिवारी (ता. 16) सिल्लोड येथे मृत्यू झाला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी सूचना देऊनही बारा तास या विभागाचे कर्मचारी या गावात फिरकलेच नाहीत.

गावकऱ्यांनी वारंवार संपर्क साधूनही वन विभागाचे कर्मचारी ए. ए. राठोड यांनी घटनेचे गांभीर्य बघता येथील गावकऱ्यांनाच अरेरावीची भाषा वापरत हरीण तेथे ठेवा, मी माणसांना पाठवितो, असे सांगत रात्रभर कुठलीही कारवाई केली नाही. सकाळी दोन वनमजूर हरणाला घेण्यासाठी आले. त्यांनी आवश्‍यक ती काळजी न घेता दुचाकी वाहनावरून हरणाला भराडी (ता. सिल्लोड) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर सिल्लोड येथील पशुसंवर्धन रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र यात हरणाचा मृत्यू झाला. सिल्लोड येथील वन विभाग कायम काही ना काही कारणास्तव चर्चेत राहत आहे.

हेही वाचा - सावधान...साचलेल्या पाण्यात डेंगींचे डास

येथील कार्यालयाचा कारभार म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार बनला असून अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्यांशी उद्धटपणेच वागत असल्याचे प्रकार अनेकदा घडले. शुक्रवारी (ता.15) सिसारखेडा
येथे कुत्र्यांनी हरणावर हल्ला चढवत त्याला जखमी केले. हे हरीण गावामध्ये आल्यानंतर गावकऱ्यांनी कुत्र्यांना हाकलून लावत हरणाला मंदिराच्या ठिकाणी सुरक्षितस्थळी ठेवले. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी गावकऱ्यांनी वारंवार संपर्क साधला परंतु आमच्याकडे कर्मचारीसंख्या जास्त नाही. कुठे कुठे सांभाळायचे, असे उत्तर कर्मचारी राठोड यांनी गावकऱ्यांना दिले. संध्याकाळी आठपासून शनिवारी (ता. 16) सकाळी आठपर्यंत जखमी हरणावर उपचार झाले नाहीत. हरणाचा जीव गेल्यानंतर आता गावकरी संतप्त झाले आहेत.

हेही वाचा-या निरीक्षकावर अपहाराचा गुन्हा

लाकूडतोड व्यापारी आले हरणास घेऊन जाण्यासाठी
जखमी झालेल्या हरणावर उपचार होण्यासाठी सिसारखेडा येथील गावकऱ्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यास फोन केल्यानंतर त्याने भराडी परिसरातील लाकूडतोड व्यापाऱ्यांना हरणास आणण्यासाठी पाठविले. यामुळे वन विभागाचे कर्मचारी कोणत्या पद्धतीने काम करीत आहेत, याचा प्रत्यय येत आहे. गावकऱ्यांनी संबंधितांना तुम्ही कोण, ओळखपत्र दाखवा व हरणाला घेऊन जा, असे सांगितल्यानंतर या परिसरात
वृक्षतोड करणारे व्यापारी आल्या पावली परत गेले.

जखमी हरणाची फरपट
जखमी झालेल्या हरणास वनमजुरांनी निष्काळजीपणे दुचाकी वाहनावर टाकून त्याला उपचारासाठी नेले. आवश्‍यक ती काळजी घेऊन
हरणावर उपचार झाले असता तर त्याचा जीव वाचला असता. आता घडलेल्या घटनेमुळे वन विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे हरणाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई वरिष्ठ कार्यालयाकडून होते, याची चर्चा सुरू झाली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Careless Forest Department, Deer Lost Life