जात पडताळणीची वेबसाइट हँग, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांचा उत्साह

विकास गाढवे
Sunday, 27 December 2020

ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर राज्यभरातून राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांत कमालीचा उत्साह दिसून येत आहे.

लातूर : ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर राज्यभरातून राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांत कमालीचा उत्साह दिसून येत आहे. यातूनच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे ऑनलाइन अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. याचा परिणाम ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी असलेली सीसीव्हीआयएसची वेबसाइट सातत्याने हँग होत आहे. यातूनच काही ठिकाणी अर्ज दाखल होऊन पैसे कपात झाले तरी त्याची पावती तयार (जनरेट) होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

 

 

राज्य निवडणूक आयोगाने मुदत संपलेल्या व कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यापासून सातत्याने गोंधळ सुरू आहे. यात आयोगाकडून रोज वेगवेगळे निकष येत असल्याने उमेदवार भांबावून गेले आहेत. यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून जात प्रमाणपत्रदेखील पडताळणीसाठी दाखल करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीच सुरू करण्यात आली आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांना ऑनलाइनशी संघर्ष करावा लागत आहे. सरपंचपदाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर निवडणुकीतील समीकरणे बदलली. यामुळे पूर्वी निश्चित झालेल्या उमेदवारांत बदल झाला. याचा परिणाम जात प्रमाणपत्र काढण्यापासून ते पडताळणी समितीकडे ऑनलाइन दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झाली.

 

 

बुधवारपासून (ता. २३) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली असली तरी इच्छुकांकडून कागदपत्रांची जमवाजमव सुरूच आहे. यातूनच जात पडताळणी समित्यांकडे ऑनलाइन अर्ज मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. यामुळे जात पडताळणीची ऑनलाइन अर्ज प्रणाली हँग होत आहे. काही ठिकाणी अर्ज दाखल करून शुल्क भरल्यानंतर खात्यातून पैसे कपात होत आहेत. मात्र, त्याची पावती तयार होत नसल्याने इच्छुकांची अडचण झाली आहे.

 

 

राज्यभरात पाचशेहून अधिक असे प्रकार झाल्याचे सांगण्यात येत असले तरी पावती मिळत नसल्याने निवडणूक लढवण्याची तयारी वाया जाण्याची भीती उमेदवारांतून व्यक्त होत आहे. दरम्यान अडचणीच्या वेळी संपर्कासाठी संबंधित जिल्हा समित्यांच्या सदस्य असलेल्या उपायुक्तांचे मोबाईल क्रमांक दिले आहेत. त्यावर इच्छुक उमेदवार सतत संपर्क करीत असल्याने त्यांचेही मोबाईल हँग झाले आहेत. काही सदस्यांकडून मोबाईल उचलले जात नसल्याच्या तक्रारीही सुरू होत्या. यातच खास ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा समित्यांचे कामकाज सरकारने सुटीच्या दिवशीही सुरू ठेवले आहे. तरीही या ऑनलाइनच्या समस्यांमुळे इच्छुक हैराण झाले आहेत.

 

 

 

तांत्रिक अडचणी दूर होतील
याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सचिव तथा संशोधन अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की ग्रामपंचायत निवडणुकींमुळे मोठ्या संख्येने अर्ज दाखल होत असल्याने भार वाढून जात पडताळणीची वेबसाइट हँग होत आहे. काही प्रकरणात अर्ज दाखल करताना अडचणी येत आहे. ही तांत्रिक समस्या असून, आमच्याकडे तक्रार आल्यास आम्ही ती आयटी सेलकडे पाठवत आहेत. अडचणी आलेल्या उमेदवारांनी तातडीने समितीच्या कार्यालयाला संपर्क साधल्यास तक्रारीचे निवारण करण्यात येईल.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caste Validity Website Hangs, Grampanchayat Election Latur News