डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घराघरांत अन् मनामनांत, महामानवाला कौटुंबिक पद्धतीनेच करूयात अभिवादन  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला घरातच पुष्पहार अर्पण करून व बुद्धवंदना घेऊन मोठ्या उत्साहात जयंती साजरी करा, रात्री आठ वाजता आपल्या घरी पाच मेणबत्त्या लावून पंचशील आचरण करून बुद्ध-भीमाला वंदन करा. बीड जिल्हावासीयांनी तसा संकल्प केला आहे.

बीड - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मंगळवारी (ता. १४) जयंती आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती तर उत्साहातच होणार आहे. मात्र, ती सार्वजनिक गर्दी करून नाही, तर घराघरांत आणि मनामनांत साजरी करून महामानवाला अभिवादन करून करायची आहे. 

बीडमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. सकाळी शहरातून फेरी, नंतर बुद्धवंदना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी होते. मान्यवरांसह डॉ. आंबेडकरप्रेमींची अभिवादन करण्यासाठी पुतळा परिसरात गर्दी असते. त्यानंतर दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजत-गाजत निघालेली मिरवणूक रात्री ११ पर्यंत सुरू असते. यातही लहानथोरांसह महिला व तरुणींचा मोठा सहभाग असतो.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

अगदी हर्षोल्हासात जयंतीची बीडची परंपरा आहे. दरम्यान, बीड शहरात विनावर्गणी जयंतीची परंपरा यंदाही कायम ठेवत पहिल्याच बैठकीत पाच लाख रुपये जमा झाले होते. मोठ्या जयंतीचे यंदाही नियोजन हेाते; परंतु यंदा देशासमोर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे गर्दी टाळणे गरजेचे आहे. बीड जिल्हावासीयांनी देखील तसा संकल्प केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाईक, चळवळीतील मान्यवरांनी देखील देशाला राज्यघटना देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरीच अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

सकाळी नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला घरातच पुष्पहार अर्पण करून व बुद्धवंदना घेऊन मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करा, रात्री आठ वाजता आपल्या घरी पाच मेणबत्त्या लावून पंचशील आचरण करून बुद्ध-भीमाला वंदन करा, असे आवाहन पप्पू कागदे यांनी केले आहे. आंबेडकरी जनता शिस्तप्रिय व कायद्याचे पालन करणारी आहे, असेही ते म्हणाले. खबरदारी म्हणून आंबेडकरी समाजातील प्रत्येकाने आपापल्या घरीच बाबासाहेबांची जयंती साजरी करावी.

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

स्वतःच्या घरातच फोटो समोर ठेवून बाबासाहेबांच्या विचारांचे पूजन करावे. त्यांचे विचार आत्मसात करून कोरोनाच्या संकटात सापडलेल्यांना सर्वतोपरी मदत केल्यास जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल, असे बाबूराव पोटभरे म्हणाले. चळवळीतील प्रत्येकाने तसेच आवाहन केले आहे. जिल्हावासीयांनी देखील महामानवाला घरीच अभिवादन करून मनामनांत आणि घराघरांत जयंती साजरी करण्याचा संकल्प केला आहे. 

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून...

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrate the birth anniversary of Dr. BabaSaheb ambedkar at home