कष्टाच्या साथीदारा घास गोड मानिजे... 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 August 2020

कोरोनामुळे जग थांबले; पण जगाच्या भुकेची चिंता वाहत शेतकरी शेतात राबला, राबतोय. त्याच्या कष्टाचा वाटेकरी असणाऱ्या साथीदाराचा मंगळवारी (ता. १८) पोळा. साधेपणाने सण साजरा झाला; पण लाडक्या बैलजोडीची सजावट, कौतुक करण्यास शेतकरी कमी पडला नाही.

जालना -  कोरोनामुळे जग थांबले; पण जगाच्या भुकेची चिंता वाहत शेतकरी शेतात राबला, राबतोय. त्याच्या कष्टाचा वाटेकरी असणाऱ्या साथीदाराचा मंगळवारी (ता. १८) पोळा. साधेपणाने सण साजरा झाला; पण लाडक्या बैलजोडीची सजावट, कौतुक करण्यास शेतकरी कमी पडला नाही. परिस्थिती कशीही असो; लाडक्या बैलजोडीचे तोंड पुरणपोळीने गोड केले. 

कोरोनामुळे यंदा सण-उत्सवाच्या आनंदावर पाणी फेरले गेलेले आहे. खबरदारी घेत, साधेपणाने सण साजरे होत आहेत. शेतकऱ्यांचा दिवाळीप्रमाणे महत्त्व राखून असलेला पोळाही याला अपवाद नाही. गेल्या आठवड्यापासून ठिकठिकाणी सतत पाऊस पडत असल्याने एकीकडे पिकांची चिंता आहेच; पण मंगळवारी पावसाने बहुतांश भागात उघडीप देत दिलासा दिला. त्यामुळे पोळा सणाचा आनंद मोकळ्या मनाने अनेक भागांत घेता आला.

हेही वाचा : दिवस येतील छान, घेऊ नका ताण

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत शेतकऱ्यांनी सण साजरा केला. बैलजोडीची सजावट करीत काहींनी शेतात, खळ्यात, परसात, तर काहींनी आपल्या घरासमोर मोकळ्या जागेत मनोभावे पूजा केली. बैलजोडीस गोडधोड पदार्थ खाऊ घालून त्याचे दर्शन घेतले. त्याच्या कष्टाबाबत कृतज्ञता व्यक्त केली. 

हेही वाचा : पावसाचं पाणी, आबादानी...

जिल्ह्यात अंबड, बदनापूर, भोकरदन, परतूर, मंठा, घनसावंगी, जाफराबाद, जालना शहरासह तालुक्यातील गावामध्ये यंदा पोळा सण साध्या पद्धतीने साजरा केला. आपापल्या घरी बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला. यंदा कसलाही मिरवणुकीचा गाजावाजा न करता साध्या पद्धतीने पोळा सण शांततेत साजरा करण्यात आला.  अनेकांनी घरी मातीच्या बैलांची पूजा केली.  

 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebration of Pola festival