लातूर सीईओ गोयल यांचा पहिल्याच सभेत प्रभाव! अधिकाऱ्यांना मिळाला धीर  

विकास गाढवे
Sunday, 15 November 2020

सदस्यांकडून सतत टारगेट होणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलाच धीर आला 

लातूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पहिल्यांदाच स्वतःचा प्रभाव पाडला. काही सदस्यांना आचारसंहितेचा बडगा दाखवत तर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या काही सदस्यांना थेट असे आरोप न करण्याबाबत सुनावले. यामुळे काही सदस्यांना तत्कालीन दबंग मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांची आठवण आली तर मागच्या सभेपर्यंत नाराज असलेल्या अध्यक्ष राहुल केंद्रे यांनीही गोयल यांची बाजू उचलून धरत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सभेतील गोयल यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सदस्यांकडून सतत टारगेट होणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलाच धीर आला.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
सप्टेंबरमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेला ताप आल्याचे सांगून दांडी गोयल यांच्यावर अध्यक्ष केंद्रे नाराज झाले होते. याच कारणामुळे त्यांनी सभा रद्द केल्याचे सांगितले होते. रुजू होताच गोयल यांनी ‘एकला चलोरे’ची भूमिका घेतली होती. सदस्यांना दूर ठेवत त्यांनी त्यांच्याच मतदारसंघातील भेटी व कार्यक्रम घेतले होते. आयएएस झाल्यानंतर गोयल यांची येथे पहिली नियुक्ती आहे. अनेक मागण्या व कामांना सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने सदस्य व महिला सदस्यांचे नातेवाईकही त्यांच्याबद्दल नाराज होते. यामुळेच मंगळवारच्या सभेत सदस्य त्यांचे उट्टे काढण्याची शक्यता असतानाच गोयल यांनी सभेत विविध विषयात जोरदार हस्तक्षेप करून स्वतःतील आक्रमक अधिकाऱ्यांचा प्रत्यय सर्वांना दिला. काही विषयावरील चर्चा व आश्वासनांना त्यांनी आचारसंहितेची आठवण करून देत आवर घालण्यास भाग पाडले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशातील ७० : ३० चा फॉर्म्युला रद्द केल्याबद्दल पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठरावही घेता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उपाध्यक्ष दगडूबाई साळुंके यांनी त्यांना अधिकाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळत नसल्याची खंत व्यक्त करताना काही कामांचा उल्लेख करताच आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे सांगत गुन्हा दाखल करावा लागेल, असे सांगण्यासही गोयल यांनी मागेपुढे पाहिले नाही. सभेत अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे थेट आरोप करता येणार नसल्याचे बजावत त्यांनी पुरावे देण्याची सूचना केली. सभेतील गोयल यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक महिन्यांपासून सदस्यांकडून टारगेट होत असलेल्या अधिकाऱ्यांना चांगलाच धीर आला. एक चांगला कॅप्टन मिळाल्याची भावना अधिकाऱ्यांत होऊन सर्वांना बळ आले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
आधी वाद, नंतर संवाद 
गोयल हे अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या आरोपावर जोरदार चर्चा झाली. एका सदस्याने त्यांच्या कक्षात (केबिन) जाण्यास भीती वाटत असल्याचे सांगितले. आरोप फेटाळून लावत कक्षाची दारे सर्वांसाठी खुले असल्याचे गोयल यांनी सांगितले. यात अध्यक्ष केंद्रे यांनी गोयल नवीन असल्याचे व सुरवातीला वाद होतच असतात, असा अनुभव व्यक्त केला. यासाठी त्यांनी स्वतःचा गोयल व यापूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांच्यासोबत त्यांचा आधी वाद व नंतर संवाद झाल्याचा दाखला दिला. शेवटी काही सदस्यांनी पूर्वीच्या दबंग अधिकाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाला उजाळा देत एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याची गरज व्यक्त करत गोयल यांच्याबाबतीत अध्यक्ष केंद्रे यांनी व्यक्त केलेल्या सुरात सुर मिसळण्याचा प्रयत्न केला. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CEO Goyal influence in first meeting latur news