६६ वर्षांची परंपरा असलेल्या चापोली ते कपिलधार महापदयात्रा यंदा खंडित! 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली 

चापोली (लातूर) : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी सुरू केलेली चापोली ते कपिलधार महापदयात्रा यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे ६६ वर्षांपासूनच अखंडितपणे सुरू असलेल्या या परंपरेला यंदा मात्र खंड पडणार आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

चापोली ते कपिलधार महापदयात्रा ही चापोलीवासियांसाठी मान, सन्मान व उत्साहाची समजली जाते. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे वर्ष १९५४ मध्ये काही काळ चापोली येथील भीमाशंकर मल्लिशे यांच्या घरी स्थायिक होते. याच काळात त्यांच्या नेतृत्वात चापोली ते मन्मथ स्वामी यांची संजीवन समाधीचे ठिकाण श्रीक्षेत्र कपिलधार या पदयात्रेची सुरवात झाली होती. सुरवातीला त्यांच्या सोबत येथील काही ठरावीक भक्त होते. मात्र, कालांतराने राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी सुरू केलेल्या या पदयात्रेचे रोपटे आज महाकाय वटवृक्ष बनले आहे. आज ही पदयात्रा फक्त चापोलीपर्यंत मर्यादेत न राहता राज्यातील लातूर, नांदेड, बीड आदी जिल्ह्यांतील भाविकांसह आंध्रप्रदेश व कर्नाटकातील लाखो भक्त या पदयात्रेत सहभागी होत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
या महापदयात्रेचे प्रणेते राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे ही महापदयात्रा पोरकी झाली होती. त्यात रविवारी (ता. २२) येथून निघणारी महापदयात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना यंदा दोन मोठे धक्के सहन करावे लागत आहेत. आजपर्यंत ही पदयात्रा एकदाही खंडित झाली नव्हती. भाविक आपल्या शेतातील व प्रपंचाची कामे करून महापदयात्रेत जाण्यासाठी तयारीला लागला होता. लातूर, नांदेड व इतर ठिकाणच्या भाविकांनी चापोली येथे महापदयात्रेसाठी दिंडी घेऊन येऊ नये. काही ठराविक प्रतिनिधी कपिलधारला जाणार आहेत असे आवाहन चापोली-कपिलधार महापदयात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून महापदयात्रेची परवानगी मागितली. मात्र, महापदयात्रेत हजारो भाविक येतात. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने त्यांनी परवानगी नाकारली. भाविकांनी आपल्या घरीच पूजा करावी. पुढच्या वर्षी मोठ्या उत्साहात आपण महापदयात्रेत सहभाग घेऊन राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी सुरू केलेली ही महापदयात्रा अखंडितपणे सुरू ठेवुयात. 
- संजय उस्तुर्गे, कार्याध्यक्ष, चापोली-कपिलधार महापदयात्रा समिती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chapoli to Kapildhar Mahapadayatra tradition this year break