esakal | अंबाजोगाईत निलंबित तलाठी, मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा; लष्कराच्या जमिनीचे फेर प्रकरण
sakal

बोलून बातमी शोधा

3crime_201_163

अंबाजोगाई येथील तत्कालीन निलंबित तलाठी सचिन केंद्रे आणि मंडळ अधिकारी रंगनाथ कुमटकर या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.

अंबाजोगाईत निलंबित तलाठी, मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा; लष्कराच्या जमिनीचे फेर प्रकरण

sakal_logo
By
प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (जि.बीड) : येथील तत्कालीन निलंबित तलाठी सचिन केंद्रे आणि मंडळ अधिकारी रंगनाथ कुमटकर या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. लष्कराची ११ हेक्टर २२ आर शेतजमिनीचा फेर खासगी व्यक्तींच्या नावे केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये हा गुन्हा नोंद करण्यात आला.तत्कालीन उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी हा फेरफार यापुर्वीच रद्द केला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून दोघे ठार, विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

शहरातील सर्व्हे क्रमांक (५९२) हा भाग शासकीय अध्यापक महाविद्यालय, जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, शासकीय प्रेक्षागृह इमारत, शासकीय निवासस्थान इमारत, सुरक्षारक्षक कर्मचारी वसाहत, हे एकूण क्षेत्र १३ हेक्टर ४२ आर इतके आहे. हे क्षेत्र निजामकाळापासून अभिलेखात ‘फौज निगराणी तामिरात’ या नोंदीखाली म्हणजेच ही जमीन लष्कराच्या ताब्यातील आहे. ही जागा सैन्य दलाने पाच फेब्रुवारी २०१६ ला जिल्हाधिकारी व शासनाच्या मदतीने मोजून घेतली होती. तसेच याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात ही सर्व जमीन लष्कराकडे असल्याची नोंद आहे.


असे असतानाही येथील तत्कालीन तलाठी सचिन केंद्रे व व मंडळ अधिकारी रंगनाथ कुमटकर यांनी यातील ११ हेक्टर २२ आर (२८ एकर) शेतजमीन क्रमांक (२९४९७) इतर फेरफार ता. २८ एप्रिल २०२० रोजीचे दुरुस्ती फेरफारपत्राचा आधार घेत अमित मुथा, उगमाबाई मुथा, कमल संचेती, कांचनबाई बोथरा, ज्योत्स्ना मुथा, ज्योती मुगदिया, प्रकाश मुथा, प्रमोद मुथा, प्रेमचंद मुथा, ललित मुथा, विजय मुथा, विनोद मुथा, शोभा सुखानी, सुमित मुथा, संतोष मुथा, दीपक मुथा यांच्या नावे केली होती. या प्रकाराची माहिती उपअधीक्षक भूमी अभिलेख, अंबाजोगाई यांच्या कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर त्यांनी पडताळणी करून सदरील नोंदणी बेकायदेशीर असल्याचा अहवाल महसूल विभागाला दिला.

भूकंपग्रस्तांनी व्यक्त केली शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता; शेतकरी म्हणाले, साहेब आमचा तुमच्यावर विश्‍वास आहे

जिल्हाधिकारी बीड व लष्कर विभागाची परवानगी न घेता, तसेच शासनाचे मुद्रांक शुल्क बुडवून तसेच शासनाचा नजराना बुडवून हा फेर घेण्यात आला आहे. सदरील जमीन शासकीय असल्यामुळे झालेला व्यवहार बेकायदेशीर असल्याचे पत्र भूमि अभिलेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते. त्यानंतर तत्कालीन उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी सुनावण्याअंती ही फेरनोंद रद्द केली. ‘भारत सरकार संरक्षण मंत्रालय’ अशी नोंद तलाठी यांनी तत्काळ अधिकार अभिलेख्यात घ्यावी असे आदेश त्यांनी काढले.

दरम्यान, फेर प्रकरणाची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नोंद घेतली. तत्कालिन निलंबित तलाठी सचिन केंद्रे आणि निलंबित मंडळ अधिकारी रंगनाथ कुमटकर यांनी शासनाची फसवणूक करून शासकीय मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी नायब तहसीलदार गणेश सरोदे यांना दिले. सदरील आदेशानुसार गणेश सरोदे यांच्या फिर्यादीवरुन सचिन केंद्रे आणि मंडळ अधिकारी रंगनाथ कुमटकर या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस निरीक्षक सिद्धार्थ गाडे हे तपास करित आहेत.

संपादन - गणेश पिटेकर