पंधराची जुडी एक रुपयाला, भाववाढीच्या प्रतीक्षेने कोथिंबीर फुलोऱ्यात, शेतकरी त्रस्त!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

पिंपळगाव रेणुकाई परिसरातील चित्र, शेतकरी त्रस्त 

पिंपळगाव रेणुकाई (जालना) : भाववाढीच्या आशेने ठेवलेल्या कोथिंबिरीला भावच नसल्याने कोथिंबिरीला फुले लागली आहे. भाव वाढत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांकडून स्वस्तात आणलेल्या भाजीपाल्याचे भाव व्यापाऱ्यांनी गगनाला भिडवले होते. शिवाय आठवडी बाजारही सर्वत्र बंद असल्याने शेतकऱ्यांना आपला भाजीपाला स्वतः बाजारात विकता आला नसल्याने व्यापाऱ्यांनाच द्यावा लागला. यात व्यापाऱ्यांनी चांगभले करून घेतले. सध्या बऱ्याच महिन्यानंतर आठवडी बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला शेतातून थेट बाजारात विक्रीसाठी काढला आहे. नेमके याच काळात भाजीपाल्याचे भाव कमालीचे उतरल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पंधरा रुपयाला विकली जाणारी कोथिंबिरीची जुडी रुपयाला झाली आहे. यावर्षी पर्जन्यमान चांगले राहिल्याने भाजीपाला उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली आहे. त्यात पिंपळगांव रेणुकाईसह शेलूद, लेहा, हिसोडा, सावंगी अवघडराव, जळगाव सपकाळ, रेलगाव, मोहळाई आदी गावांमध्ये कोथिंबिरीची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. आज ना उद्या भाव वाढतील या आशेवर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या कोथिंबिरीला आता फुले लागले असून निदान आता धणे तरी मसाला म्हणून हाती लागतील या आशेने ठेवले आहे. मात्र त्यालाही ढगाळ वातावरणाचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अतिवृष्टी, लॉकडाउनमुळे शेतीचे पार आर्थिक गणित बिघडले आहे. कमी काळात भाजीपाला लागवड करून आर्थिक घडी सुधारावी या अपेक्षेने कोथिंबीर, कोबी लागवड केली. मात्र भाजीपाल्याचे भाव एकदम उतरल्याने कोबी जनावरांना देण्याची वेळ आली तर कोथिंबिरीला फुले आली आहे. 
- विलास सपकाळ, शेतकरी, पिंपळगाव रेणुकाई 

(संपादन-प्रताप अवचार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cilantro blooms anticipation price hike farmers distressed