शासनाचे सर्व नियम धाब्यावर ; कळंबमध्ये प्लॉटची अवैध विक्री

दिलीप गंभीरे
Friday, 4 December 2020

शहर परिसर तसेच उपनगरात प्लॉट खरेदी करण्यासाठी लोकांचा ओघ सुरू आहे. तांदुळवाडी रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक ११० चार दिवसातच १० ते १२ प्लॉट खरेदीचे व्यवहार झाले आहेत.

कळंब (उस्मानाबाद) : शहरात पुन्हा भू माफियांनी बनावटगिरी सुरू केली आहे. शासनाच्या नियमानुसार खुल्या प्लॉटची रचना न करता व जागेचा 'एनए' न जोडता खरेदी विक्रीचे व्यवहार जोरात सुरू आहेत. यातून रजिष्ट्री कार्यालयातील अधिकारी मालामाल होत असून प्लॉट खरेदी विक्रीच्या व्यवहाराला आवश्यक कागदपत्र न जोडल्याने न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्याचे खरेदीदाराच्या मानगुटीवर टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे पक्षकाराची फसवणूक होत असल्याचा प्रकार रजिष्ट्री अधिकाऱ्यांना दिसत नाही का ? असे सवाल नागरिकांमधून उपस्थित केले जात आहे.

हे ही वाचा : विजयाच्या हॅट्ट्रीकनंतर सतीश चव्हाणांनी मानले मतदारांचे आभार; म्हणाले सर्वांची साथ प्रत्येक पावलावर होती

शहर परिसर तसेच उपनगरात प्लॉट खरेदी करण्यासाठी लोकांचा ओघ सुरू आहे. तांदुळवाडी रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक ११० चार दिवसातच १० ते १२ प्लॉट खरेदीचे व्यवहार झाले आहेत. प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार करतेवेळी संबंधितांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसविले आहे. प्लॉटची रचना करतेवेळी यामध्ये वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधेबाबत विचार करणे आवश्यक आहे. शिवाय ओरिजनल एने-लेआऊट नकाशा जोडणे आवश्यक आहे. प्लॉट खरेदी विक्रीच्या व्यवहाराला शासनाच्या नियमानुसार आवश्यक कागदपत्रे जोडली आहेत का याची खात्री दुय्यम निबंधक अधिकारी (रजिष्ट्री) यांनी करणे बंधनकारक असताना सर्व नियम पायदळी तुडविल्याचा प्रकार घडला आहे.

हे ही वाचा : सायबर क्रॉईमच्या तपासासाठी पोलिस यंत्रणा सक्षम 

प्लॉटची जागा एकाची, एनए लेआऊट दुसऱ्याचा

सध्या शहरात भूमाफियांनी हौदोस घातला आहे. मोक्याच्या ठिकाणी लोकांना भुरळ पडेल अशी जागा दाखवून प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार जोरदार सुरु आहेत. शहरातील तांदुळवाडी रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक ११० मध्ये अशाच प्रकार समोर आला आहे. प्लॉट मालकांना वारसाहक्कातून जमीन मिळाली आहे. नियमबाह्य त्याचे प्लॉट पाडून दुसऱ्या व्यक्तीच्या नावे असलेला एनए लेआऊट जोडून विक्री करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

लोकांची होतेय फसवणूक

सोयाबीन उस बिले आदींमुळे लोकांची आर्थिक बाजू भक्कम झाली आहे. शहरात प्लॉट खरेदीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार सर्रास लोक करीत आहेत. भूमाफिया व रजिष्ट्री अधिकाऱ्यांच्या संगनमताने पक्षकारांना भविष्यात न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार असे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याचे प्रकार सुरू आहेत.

दुय्यम निबंधक (रजिष्ट्री) अधिकारी व्यंकटी माडे यांनी सांगितले की, खरेदी विक्रीचा व्यवहाराच्या संदर्भातील सर्वस्वी जबाबदारी घेणारे आणि देणाऱ्यांची असून तसे शपथपत्र घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the city as well as in the suburbs people are flocking to buy land