कोरोनाचे फुलांवरही बसले घाव 

बाबासाहेब गोंटे
Sunday, 29 March 2020

कोरोनामुळे संचारबंदी लागू झाली. फुलांसह सर्वच मार्केट बंद झाले. बहरलेल्या फूलशेतीला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. हजारो रुपयांचा उत्पादन खर्च करून सुद्धा हातातोंडाला आलेले फुलांचे बहरलेले पीक नाइलाजास्तव बांधावर उपटून फेकण्याची केविलवाणी वेळ आली. 

अंबड (जि.जालना) - कोरोनामुळे फुलांसह सर्वच मार्केट बंद असल्यामुळे तसेच मागणीच नसल्याने फूलशेतीलाही फटका बसला आहे. शेतकरी केशव लाघडे यांनी नाइलाजाने शेतातील दोन एकरांवरील फूलझाडे उपटून बांधावर फेकली आहेत. 

शेतकरी केशव लाघडे यांनी उत्पन्नाचे स्वप्न अंगी बाळगत दहीपुरी-दूधपुरी शेतशिवारातील आपल्या दोन एकर शेतजमिनीमध्ये गलांडासह विविध फुलझाडे लावली. कष्ट घेत ही फुलशेती फुलविली.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

आधीच ओल्या दुष्काळामुळे कपाशीचे पीक उद्‍ध्वस्त झाले होते, कपाशी काढून त्यांनी मार्च-एप्रिलमध्ये बाजारात विक्रीस येईल या अंदाजाने डिसेंबरात रोहनवाडी (ता. जालना) येथून ११ हजार रुपयांची शेवंती व गलांडा फुलांची रोपे आणून लागवड केली. त्यास वेळोवेळी खतांच्या मात्रा, औषध फवारणी केली, ठिबकद्वारे पाणी सुरू होते.

हेही वाचा :  चाळीस किलोमीटर पायपीट करून गाठले बदनापूर 

कोरोनामुळे संचारबंदी लागू झाली. फुलांसह सर्वच मार्केट बंद झाले. बहरलेल्या फूलशेतीला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. हजारो रुपयांचा उत्पादन खर्च करून सुद्धा हातातोंडाला आलेले फुलांचे बहरलेले पीक नाइलाजास्तव बांधावर उपटून फेकण्याची केविलवाणी वेळ त्यांच्यावर आली आहे. 

गेल्या दोन-तीन वर्षांपासून विहिरी, बोअर, तलावाला दुष्काळामुळे पाणी नव्हते. यावर्षी उन्हाळ्यात पिके घेत आहोत, जर लवकरच कोरोना संसर्गाचा प्रभाव ओसरला नाहीतर फळबागांसह उन्हाळी भाजीपाला, फुलांचे पिके घेणाऱ्या शेतकऱ्‍यांना खूप मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पुरता उद्‍ध्वस्त झाला आहे. 
- केशव लघाडे 
फूलशेती उत्पादक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona affected to flowers farm