अर्थकारणाचेही लॉकडाउन... 

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

जालना -  ‘जालना सोने का पालना’ ही म्हण सर्वत्र बोलली जाते; मात्र, लॉकडाउनच्या एका महिन्याच्या कालवधीत स्टील उद्योग आणि बाजारपेठ पूर्णपणे बंद असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे लॉकडाउन उघडल्यानंतर व्यापारी, उद्योजक, मजूर, खासगी नोकरदार, शेतकरी, बिगारी कामगार अशा अनेकांना आर्थिक संकटाला तोंड देण्याची वेळ येणार आहे, यात शंका नाही. 

कोरोना विषाणूचा विळखा वाढू नये, म्हणून राज्य आणि केंद्र शासनाने लॉकडाउन लागू केले. ता. २२ मार्चपासून या लॉकडाउनला सुरवात झाली असून, ता. २२ एप्रिलला एक महिना पूर्ण झाला आहे. जालना शहर हे व्यापाऱ्यांचे शहर म्हणून राज्यभर ओळखले जाते; मात्र व्यापार ठप्प झाल्यानंतर अर्थचक्र थांबलेले आहे. यामुळे व्यापाऱ्यांवर निर्भर असलेले मजूर, हमाल, बिगारी कामगार यांची संख्या लक्षणीय आहे.

त्यामुळे अनेक कुटुंबांचे रोजंदारीवर चालते. तर दुसरीकडे स्टील उद्योगही लॉकडाउनमध्ये बंद पडल्याने हजारो मजुरांचा आणि त्याच्या कुटुंबांचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

महिनाभराच्या लॉकडाउनमुळे उद्योगनगरीचे आर्थिक चक्र थांबल्याने मजुरांच्या हातात येणारा पैसाही भविष्यात थांबण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणू आटोक्यात आल्यानंतर लॉकडाउन हे टप्प्याटप्प्याने उघडल्यानंतर सर्व व्यापार, उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू होणार की नाही, याबाबत शंका आहे. अशात या व्यापार आणि उद्योगावर अवलंबून असलेल्या मजुरांच्या आणि खासगी नोकरदारांच्या हाताला पूर्वीप्रमाणे काम मिळेल की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे अनेकांच्या उत्पन्नात या महिनाभरात घट निर्माण झाली आहे. त्यामुळे जालन्याच्या व्यापाराला आणि पर्यायाने बाजारपेठेला पूर्वपदावर येण्यास काही महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. 

जागतिक स्तरावर सोन्याचे भाव भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाला सोने खरेदी करणे जड होईल. त्याचा सराफा व्यापारांवर विपरीत परिणाम होईल. सध्या सोने खरेदीचे अनेक मुहूर्त लॉकडाउनमध्ये गेल्याने याचा उत्पन्नावर परिणाम झाला आहे. परिणामी भविष्यात सोने कारागीर आणि मजुरांच्या संख्येत कपात करण्याची वेळ सराफा व्यापाऱ्यांवर येणार आहे. 
- भरत गादिया, 
सराफा व्यापारी, जालना. 

लॉकडाउन वाढविणे किंवा कमी करणे हे आपल्या हाती नाही; परंतु लॉकडाउनमुळे सर्व व्यापार पूर्णपणे कोलमडला आहे. लग्नसराईत सर्वाधिक व्यवसायाचे दिवस असतात; मात्र ते लॉकडाउनमध्ये गेल्याने पुढील काळ व्यापारासाठी कठीण आहे. उत्पन्न कमी झाल्याने मजूर, नोकर यांची रोजंदारी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मजूर कमी करण्याची वेळ व्यापारीवर्गावर पुढील काळात येण्याची शक्यता आहे. 
- वासुदेव देवडे, 
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे विक्रेते. 

कापड उद्योगात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. लग्नसराईचे दिवस लॉकडाउनमध्ये गेले आहेत. लॉकडाउन उघडल्यानंतर ग्राहक कापड दुकानात येणे कठीण आहे. त्यामुळे मजुरीचा, रोजंदारीचा प्रश्नही निर्माण होणार आहे. 
- रामनिवास बगडिया, 
कापड व्यापारी, जालना 

सध्या अर्थचक्र बंद आहे. त्यामुळे उद्योगासह सर्व छोटे-मोठे व्यापार आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे. परिणामी रोजगार कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काटकसर करण्याची वेळ येणार आहे. जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार, कापूस उत्पादक शेतकरी, फळ उत्पादक, मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. लॉकडाउनमुळे बाजारात ग्राहक नसल्याने शेतकरीही आर्थिक संकटात आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मालालाही भाव नाही. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाच्या मदतीशिवाय तो पुन्हा उभा राहू शकणार नाही. 
प्रा. डॉ. भारत खंदारे, अर्थतज्ज्ञ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com