esakal | आष्टी : कोरोनाबाधित मृतदेहाची अवहेलना, एनएचएमने दिले कारवाईचे आदेश  
sakal

बोलून बातमी शोधा

corona death.jpg

एनएचएमच्या सहसंचालकांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र, म्हटले चौकशीत दोषी आढळलेल्या संबंधितावर कारवाई करावी.  

आष्टी : कोरोनाबाधित मृतदेहाची अवहेलना, एनएचएमने दिले कारवाईचे आदेश  

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : कोरोनाबाधीत महिलेच्या मृतदेह अवहेलना प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, असे पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहसंचालकांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले. आष्टी येथे हा प्रकार घडला होता.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 
आष्टी तालुक्यातील केरूळ येथील ६५ वर्षीय कोरोना बाधित महिलेवर आष्टी ग्रामिण रूग्णालयात उपचार सुरु असताना महिलेचा मृत्यू झाला. नगरपंचायत व ग्रामीण रुग्णालय यांच्यातील विसंवादामुळे मृतदेहाची अवहेलना झाली. संतप्त नातेवाईकांनी रात्री मृतदेह नगरपंचायत कार्यालयासमोर आणून ठेवल्याचा प्रकार मागच्या आठवड्यात घडला. याबाबत डॉ. गणेश ढवळे यांनी तक्रार केली होती. यावरुन संबंधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक महेश बोटले यांनी गुरुवारी (ता. १२) जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोना : रुग्णसंख्या व मृत्यूंतही घट 
बीड जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यू आकड्यात घट झाली. परंतु, शुक्रवारी पुन्हा स्वामी रामानंद वैद्यकीय महाविद्यालय परिसरात सात नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यात ६१ नवीन रुग्ण आढळले. तर, दोन मृत्यूंची नोंद झाली. मागच्या काही दिवसांत मृत्यूंचा रोज वाढणारा आकडा काहीसा कमी झाला. 
शुक्रवारी ५६४ पैकी ५०३ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ६१ लोकांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. अंबाजोगाई तालुक्यात आढळलेल्या नऊ पैकी सात रुग्ण स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय परिसरात आढळले. तर, बीड तालुक्यात २४ आणि आष्टी व माजलगाव तालुक्यात प्रत्येकी पाच रुग्ण आढळले. धारुर दोन, गेवराई तीन, केज सात, परळी चार आणि वडवणी व शिरुर कासार तालुक्यात प्रत्येकी नवीन एका रुग्णाची भर पडली. या ६१ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या १४४७६ झाली. 

१३२२८ कोरोनामुक्त; ७९५ रुग्णांवर उपचार 
शुक्रवारी ७९ रुग्ण योग्य उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत १३ हजार २२८ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. सध्या जिल्ह्यात ७९५ रुग्णांवर विविध रुग्णालये आणि कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आतापर्यंत ४५५ मृत्यू 
जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर राज्यात तुलनेने अधिक आहे. आतापर्यंत ४५५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात शुक्रवारी नोंद झालेल्या दोन कोरोनामृत्यूंचा समावेश आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)