जालन्यातील कोरोनाबाधित महिलेच्या मुलीचा अहवाल निगेटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या ६१ पैकी ४४ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे बुधवारी (ता. आठ) देण्यात आली. बाधित महिलेशी निकटचा संपर्क आलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील १७ आरोग्य कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सध्या बाधित महिलेवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

जालना - जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण म्हणून समोर आलेल्या ६५ वर्षीय महिलेच्या मुलीचा अहवाल बुधवारी (ता. आठ) निगेटिव्ह आला आहे. मुलगी रांजणी (ता. घनसावंगी) येथील शाळेवर शिक्षिका असून तिने शालेय पोषण आहाराचे अन्नधान्य विद्यार्थ्यांना वाटप केले होते. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण होते. अहवाल निगेटिव्ह आल्याने गावाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 

शहरातील महिला कोरोनाबाधित झाल्याचे सोमवारी (ता. सहा) समोर आले. तिची शिक्षिका असलेल्या मुलीचीही आरोग्य तपासणी करण्यात आली. तिच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याशिवाय कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या ६१ पैकी ४४ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे बुधवारी (ता. आठ) देण्यात आली.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

बाधित महिलेशी निकटचा संपर्क आलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील १७ आरोग्य कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. सध्या बाधित महिलेवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

दरम्यान, संसर्ग बाधित महिला राहत असलेला भाग पोलिसांनी सील केला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील एक हजार कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी आरोग्य विभागाची २० पथके तैनात आहेत. 

रांजणीत निर्जंतुकीकरण 

घनसावंगी - रांजणी येथे होम क्वारंटाइन केलेल्या ग्रामस्थांना १४ दिवस सर्वेक्षणास सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्याकडून नियमित माहिती संकलित करण्यात येणार आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतीतर्फे गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले. दरम्यान, शिक्षिकेचा अहवाल निगेटिव्ह आला हे स्वागतार्ह आहे. तरीही चार ते पाच दिवसांनी दुसऱ्यांदा कोरोना चाचणी होऊ शकते. त्यामुळे रांजणी गावातील ग्रामस्थ हे क्वारंटाइन राहणार आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नागेश सावरगावकर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna