जालन्यात दोनजण कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

परतूर तालुक्यात परतलेल्या एका ४२ वर्षीय कोरोना संशयित व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी (ता. २९) रात्री मृत्यू झाला होता. या व्यक्तीचा स्वॅब नमुन्याचा अहवाल रविवारी (ता. ३१) पॉझिटिव्ह आला. तो जिल्ह्यातील पहिला कोरोनाचा बळी ठरला आहे. दरम्यान, जिल्ह्यात पुन्हा दोघे नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर दोन रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

जालना -  मुंबईवरून परतूर तालुक्यात परतलेल्या एका ४२ वर्षीय कोरोना संशयित व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी (ता. २९) रात्री मृत्यू झाला होता. या व्यक्तीचा स्वॅब नमुन्याचा अहवाल रविवारी (ता. ३१) पॉझिटिव्ह आला. तो जिल्ह्यातील पहिला कोरोनाचा बळी ठरला आहे. दरम्यान, जिल्ह्यात पुन्हा दोघे नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर दोन रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

रविवारी सकाळी जिल्ह्यात तीनजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यात अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील चाळीसवर्षीय महिला, जालना तालुक्यातील गोलावाडी-गणेशनगर येथील चाळीसवर्षीय महिला व शुक्रवारी मृत्यू झालेल्या परतूर येथील ४२ वर्षीय व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

रविवारी घरी सोडण्यात आलेल्या दोन रुग्णांपैकी एक नवीन जालना भागातील खासगी रुग्णालयातील कर्मचारी असून दुसरा रुग्ण जालन्यातील नूतनवाडी येथील आहे. या दोन्ही रुग्णांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.

हेही वाचा : दोन महिन्यानंतर वाजली तृतीयपंथीयांची टाळी

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता १२७ झाली असून, त्यातील ४६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात ८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

जालन्यात केला दफनविधी 

कोरोनामुळे मृत्यू झालेला व्यक्ती मापेगाव (ता. परतूर) येथील रहिवासी होता. इच्छा असतानाही कुटुंबीयांना त्याच्या दफनविधीला येता आले नाही. त्यांनी जालना शहरात दफनविधी करण्यास परवानगी दिली. त्यामुळे नगरपालिका व जमात-ए-इस्लामी हिंद संघटनेच्या वतीने गांधीनगर भागातील स्मशानभूमीत धार्मिक पद्धतीने त्याचा दफनविधी करण्यात आला. यावेळी योग्य ती खबरदारी घेण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna