दिलासा : दहाजणांची कोरोनामुक्ती 

महेश गायकवाड
Saturday, 6 June 2020

कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधितांपैकी दहा रुग्ण शुक्रवारी (ता. पाच) बरे झाले. त्यांच्या सलग दुसऱ्या स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

जालना -  कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधितांपैकी दहा रुग्ण शुक्रवारी (ता. पाच) बरे झाले. त्यांच्या सलग दुसऱ्या स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. सध्या कोविड हॉस्पिटलमध्ये ८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

गुरुवारी रात्री पाच व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १७४ झाली. शुक्रवारी दहा रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात जालना शहरातील सहा, जालना तालुक्यातील बेथलम येथील एक, हिवरा काबली (ता. जाफराबाद) येथील एक, हनवतखेडा (ता. मंठा) येथील एक व घनसावंगी तालुक्यातील पीरगैबवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

हेही वाचा : जालन्यात कोरोनाचा तिसरा बळी

जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळून आलेल्या ८१ जणांवर यशस्वी उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. सध्या ९० रुग्णांवर उपचार सुरू असून यातील एक रुग्ण औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपर्यंत एकही अहवाल प्राप्त झाला नाही.

 हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात ५१३ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जालन्यातील संत रामदास हॉस्टेलमध्ये २९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये २५, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात ३४, मोतीबाग येथील शासकीय वसतिगृहात ३७, पोलिस प्रशिक्षण केंद्रात २१२, परतूरमधील कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहात ३७, जाफराबादमधील हिंदुस्थान मंगल कार्यालयात ८ व जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये एका व्यक्तीचे अलगीकरण करण्यात आले आहे. अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये १५ तर शासकीय मुलींच्या वसतिगृहात २५ व्यक्ती अलगीकरणात आहेत. घनसावंगीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ३६, अल्पसंख्याक गर्ल्स हॉस्टेलमध्ये ८, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल इमारत क्रमांक दोनमध्ये २, मंठा येथील मॉडेल स्कूलमध्ये १८ व बदनापूरमधील शासकीय मुलांच्या वसतिगृहात २६ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात २ हजार ८२४ संशयित 

जिल्ह्यात कोरोनाचे एकूण २ हजार ८२४ संशयित रुग्ण आहेत. तर सध्या रुग्णालयात ६७ संशयित देखरेखीखाली आहेत. आरोग्य विभागातर्फे आतापर्यंत ३ हजार १११ व्यक्तींची तपासणी केली आहे. १७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर २ हजार ७६७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या ६६ व्यक्तींच्या अहवालाची आरोग्य विभागाला प्रतीक्षा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna