खुशखबर : जालन्यात २६ जणांची कोरोनावर मात

महेश गायकवाड
Monday, 8 June 2020

डॉक्टर, परिचारिका यांनी उपचारासाठी घेतलेल्या अथक कष्टामुळे रविवारी (ता. सात) जिल्ह्यातील २६ जणांनी कोरोनावर मात केली. तर शनिवारी (ता. सहा) रात्री उशिरा पुन्हा १४ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या १९९ वर पोचली आहे.

जालना - डॉक्टर, परिचारिका यांनी उपचारासाठी घेतलेल्या अथक कष्टामुळे रविवारी (ता. सात) जिल्ह्यातील २६ जणांनी कोरोनावर मात केली. तर शनिवारी (ता. सहा) रात्री उशिरा पुन्हा १४ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या १९९ वर पोचली आहे. जाफराबादेतील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनात बळी गेलेल्यांची संख्या पाच झाली, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

जाफराबाद येथील ५२ वर्षीय व्यक्ती अस्थमा व श्वसनाचा विकार असल्याने ग्रामीण रुग्णालयात भरती झाला होता. शुक्रवारी (ता. पाच) या रुग्णाला अत्यवस्थ स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात संदर्भीत करण्यात आले होते. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. रुग्णाचा कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला होता. 

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या बाधितांपैकी २६ रुग्ण रविवारी बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये काटखेडा (ता. अंबड) येथील पाच, अंबड शहरातील शारदानगरमधील पाच, मठपिंपळगाव येथील सहा, रोहिणा (ता. परतूर) येथील एक, जालना शहरातील नूतन वसाहत येथील चार, जालना तालुक्यातील ढोरखेडा, धोरपुरा व नूतनवाडी येथील प्रत्येकी एक व पुष्पकनगरमधील दोन व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११४ रुग्ण बरे झाले आहेत. 

हेही वाचा : दोन महिन्यानंतर वाजली तृतीयपंथीयांची टाळी

जिल्ह्यात पुन्हा १४ कोरोनाबाधित व्यक्तींची भर पडली आहे. या रुग्णांमध्ये जाफराबाद शहरातील तीन, जालना शहरातील संभाजीनगर, कादराबाद व बालाजी गल्ली (अफसा परिसर) व शंकरनगर येथील प्रत्येकी एक, घनसावंगी तालुक्यातील यावल पिंप्री येथील एक व पांगरा व राजेगाव येथील प्रत्येकी तीन व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या १९९ झाली आहे. सध्या ८० रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील पाच रुग्ण औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. 

जिल्ह्यात ४८८ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण ४८८ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. 
यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेलमध्ये २५, शासकीय निवासी वसतिगृहात ३०, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात २८, पोलिस प्रशिक्षण केंद्रात २१०, परतूर येथील कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहात ११, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात १० व जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये एक व्यक्ती अलगीकरणात आहे. अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहात २२, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेलमध्ये ४८ व अल्पसंख्याक गर्ल्स होस्टेलमध्ये १२, मंठा येथील मॉडेल स्कूलमध्ये ४० तर, कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहात १५, बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १० आणि परतूर येथील मॉडेल स्कूलमध्ये २६ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 

  • जालना कोरोना मीटर 
  • एकूण बाधित -१९९ 
  • बरे झाले-११४ 
  • उपचार सुरू-८० 
  • मृत्यू-५ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna