जालन्यात सतरा जणांची कोरोनातून सुटका 

महेश गायकवाड
Thursday, 11 June 2020

कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांपैकी सतरा रुग्ण पुन्हा बरे झाले असून, त्यांना बुधवारी (ता.१०) घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत आढळलेल्या बाधितांपैकी १४२ जण बरे झाले आहेत.

जालना -  कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधितांपैकी सतरा रुग्ण पुन्हा बरे झाले असून, त्यांना बुधवारी (ता.१०) घरी सोडण्यात आले आहे. जालना शहरातील तीन संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, सोनक पिंपळगाव (ता.अंबड) येथील कोरोनाबाधित रुग्णाचा उपचार सुरू असताना मंगळवारी (ता.नऊ) मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

तीन संशयितांचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २२२ झाली आहे. या तीन रुग्णांमध्ये जालना शहरातील उडिपी हॉटेल परिसरातील एक ७० वर्षीय पुरुष, आनंदनगर परिसरातील एक ५८ वर्षीय पुरुष, लक्ष्मीनारायणनगर परिसरातील एक १५ वर्षीय मुलाचा समावेश आहे. 

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

बरे झालेल्या सतरा रुग्णांमध्ये मापेगाव (ता. परतूर) येथील ८, जालना शहरातील मोदीखाना येथील २, मंगळबाजार येथील १, गांधीनगर येथील १, लोधी मोहल्ला येथील १, सामनगाव पंप (ता. जालना) येथील ३, जाफराबाद शहरातील एका व्यक्तीचा समावेश आहे. या सर्वांच्या दुसऱ्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

सोनक पिंपळगाव (ता. अंबड) येथील रहिवासी असलेला ६५ वर्षीय पुरुष श्वसनाचा, उच्चरक्तदाबाचा त्रास व न्यूमोनियाने ग्रस्त होता. अत्यवस्थ अवस्थेत तो रुग्णालयात भरती झाला होता. त्याच्यावर आय.सी.यू. वॉर्डात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी सांगितले आहे. आतापर्यंत आढळलेल्या बाधितांपैकी १४२ जण बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात ६९ रुग्णांवर उपचार सुरू असून, पाच रुग्णांना औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात ५१० व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण ५१० व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. 
यामध्ये जालन्यातील संत रामदास वसतिगृहात ११, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेलमध्ये २५, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात ३३, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात ३०, पोलिस प्रशिक्षण केंद्रात २०८, परतूरच्या कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहात २, अंबा रोडवरील मॉडेल स्कूलमध्ये ९, जाफराबादच्या हिंदुस्थान मंगल कार्यालयात १७, पंचगंगा मंगल कार्यालयात ३३, अंबडच्या शासकीय मुलींच्या वसतिगृहात २७, घनसावंगीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल येथे ३९, अल्पसंख्याक गर्ल्स होस्टेलमध्ये २०, मंठ्याच्या मॉडेल स्कूल येथे ४०, कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहात १५, बदनापूरच्या शासकीय मुलांच्या वसतिगृहात १ असे एकूण ५१० व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna