गुड न्यूज : कोरोनाच्या कटकटीतून पंधरा जण मुक्त 

संग्रहित चित्र.
संग्रहित चित्र.

जालना -  कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या कोरोनाबाधितांपैकी पंधरा रुग्णांवर यशस्‍वी उपचार करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. त्यांना रविवारी (ता.१४) घरी सोडण्यात आले आहे. तर जिल्ह्यात नव्याने आठ रुग्णांची भर पडल्याने बाधितांची संख्या २७७ झाली आहे. 

शासनाने लॉकडाउन शिथिल केल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी या रुग्णांच्या बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. कोविड हॉस्पिटलमधील १५ रुग्णांवर रविवारी यशस्‍वी उपचार करण्यात आल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

कोरोनामुक्त पंधरा रुग्णांमध्ये जालना शहरातील मोदीखाना परिसरातील तीन, जामवाडी (ता. जालना) येथील एक, मंठा तालुक्यातील नानसी येथील आठ, केंधळी येथील दोन व वैद्य वडगावातील एका व्यक्तीचा समावेश आहे. या सर्व रुग्णांच्या सलग दुसऱ्या स्‍वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

दरम्यान, रविवारी जिल्ह्यातील आठ संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये जालना शहरातील नानक निवास येथील तीन, रामनगर येथील विकास कॉलनीतील एक, अलंकार टॉकीज परिसरातील एक, लोधी मोहल्ला परिसरातील एक व सोनक पिंपळगाव (ता. अंबड) येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. या नवीन आठ रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २७७ झाली असून त्यापैकी १६५ बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या रुग्णालयात १०४ रुग्णांवर उपचार सुरू असून यातील आठ रुग्णांना उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात संदर्भित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. 

जिल्ह्यात ५१५ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण ५१५ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. 
सध्या जालना शहरातील संत रामदास वसतिगृहात ३९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये १४, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात २६, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात ३३, पोलिस प्रशिक्षण केंद्रात १९३, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात ६, जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये ३१, पंचकृष्ण मंगल कार्यालयात ११, आयटीआय कॉलेजमध्ये ५८ व ज्ञानसागर विद्यालयात २२ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहात ३४ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ७, घनसावंगी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ४ व अल्पसंख्याक गर्ल्स हॉस्टेलमध्ये २३, मंठा येथील मॉडेल स्कूलमध्ये ३, तर कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहात ४, बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १ व भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ६ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com