जालन्यात सात जणांची कोरोनावर मात

महेश गायकवाड
Sunday, 21 June 2020

घनसावंगी तालुक्यातील पारडगाव व राजेगाव येथील प्रत्येकी एक, सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथील एक, जालना शहरातील पोलिस मुख्यालय, जयनगर, लक्ष्मीनारायणनगर व कादराबाद येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये समावेश आहे. या सर्वांचा सलग दुसऱ्या स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात देण्यात आली आहे. 

जालना -  कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या आनंदनगरमधील ५८ वर्षीय रुग्णाचा शनिवारी (ता. २०) सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींचा एकूण आकडा अकरा झाला आहे. शिवाय शहरात पुन्हा पाच संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. दरम्यान, सातरुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

गेल्या महिन्यात ग्रामीण भागात परजिल्ह्यातून परतणाऱ्या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला होता. त्यानंतर आता शहरात कोरोनाचा संगर्स वाढत आहे. गेल्या आठवडाभरापासून शहरातील विविध विभागांत रोज नवे रुग्ण आढळून येत आहेत.

हेही वाचा : आठवणींना जोडणारा लोखंडी पूल

शुक्रवारी शहरातील आठ भागांत २८ रुग्ण आढळल्यानंतर शनिवारी पुन्हा पाच संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये देहेडकरवाडी, नरिमाननगर, रहेमानगंज, कुरेशी मोहल्ला व रामनगर परिसरातील विणकर कॉलनीमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

शनिवारी मृत्यू झालेला रुग्ण न्यूमोनिया आजाराने ग्रस्त होता. त्याला अत्यवस्थ स्थितीत ता. ८ जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांनी सांगितले आहे. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमधील सात रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

बरे झालेल्यांमध्ये घनसावंगी तालुक्यातील पारडगाव व राजेगाव येथील प्रत्येकी एक, सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) येथील एक, जालना शहरातील पोलिस मुख्यालय, जयनगर, लक्ष्मीनारायणनगर व कादराबाद येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. या सर्वांचा सलग दुसऱ्या स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात देण्यात आली आहे. 

जनता कर्फ्यूला प्रतिसाद 

दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघातर्फे शुक्रवारपासून जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी कोरेानाच्या संसर्गाकडे काणाडोळा करणारे जालनेकर तीन दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे गंभीर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शनिवारी वाढलेल्या पाच रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३५८ झाली असून, त्यापैकी २३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या रुग्णालयात ११५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात २७० व्यक्तींचे संस्‍थात्‍मक अलगीकरण 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण २७० व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील संत रामदास वसतिगृहात ४, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये १६, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात १३, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात ७, पोलिस प्रशिक्षण केंद्रात ८५, जालना शहरातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात ४०, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात २ व जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये ९, पंचकृष्णा मंगल कार्यालयात एक, टेंभुर्णीच्या काबरा विद्यालय येथे १९ व्यक्ती अलगीकरणात आहेत. अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहात २५ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ८, घनसावंगी येथील अल्पसंख्याक गर्ल्स हॉस्टेलमध्ये ८, बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १४, भोकरदन येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात ३ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये १६ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna