जालना : कोरोनातून तेराजण मुक्त

महेश गायकवाड
Monday, 22 June 2020

कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. रविवारी (ता. २१) तेरा रुग्णांवर यशस्‍वी उपचार करण्यात यश आले, त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

जालना - दिवसेंदिवस जालना शहरात पसरलेला कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होत चालला असला, तरी कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मेहनतीने या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. रविवारी (ता. २१) तेरा रुग्णांवर यशस्‍वी उपचार करण्यात यश आले, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, शहरात पुन्हा तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

जालना शहरातील विविध भागांत शुक्रवारी २८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी पाच जणांचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रविवारी (ता. २१) पुन्हा तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरवासीयांना अधिक दक्ष राहून खबरदारी घ्यावी लागणार आहे. तीन रुग्ण हे शहरातील गुडलागल्ली, संभाजीनगर, कन्हैयानगर या भागांतील असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

दरम्यान, कोविड हॉस्पिटलमधील तेरा रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांच्या सलग दुसऱ्या स्‍वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. या बरे झालेल्या व्यक्तींमध्ये अंबड शहरातील नाईकवाडी मोहल्ल्यातील पाच, जालना शहरातील रामनगर परिसरातील एक, उतार गल्लीतील तीन व राज्य राखीव दलातील चार जवानांचा समावेश आहे. 

हेही वाचा : आठवणींना जोडणारा लोखंडी पूल

वाढलेल्या तीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३६१ झाली आहे. त्यापैकी २४५ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर अकरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात १०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी सहा रुग्ण औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

दोन रुग्णांचे अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह 

आरोग्य विभागाला रविवारी प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात कोविड हॉस्पिटलमधील दोन रुग्णांच्या नुमन्यांचा अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील रामनगर व नरीमाननगर भागातील हे दोघे असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात ३०३ व्यक्तींचे संस्‍थात्‍मक अलगीकरण 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण ३०३ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये १६, मुलींच्या शासकीय निवासी वसतिगृहात ३१, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात १२, पोलिस प्रशिक्षण केंद्रात ८४, जालना शहरातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात ५९, जाफराबाद येथील हिंदुस्थान मंगल कार्यालयात तीन व जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये ९ व टेंभुर्णीच्या इ.बी.के. विद्यालय येथे ३३ व्यक्ती अलगीकरणात आहेत. अंबडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहात १२ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये ३, घनसावंगी येथील अल्पसंख्याक गर्ल्स हॉस्टेलमध्ये ८, बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १४, भोकरदन येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात ३ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह इमारत क्रमांक दोनमध्ये १६ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna