जालन्यात पंधराजणांची कोरोनावर मात 

महेश गायकवाड
बुधवार, 1 जुलै 2020

जालना शहरासह जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३१ रुग्णांची भर पडली. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमधील पंधराजणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

जालना - शहरात रोज वाढत असलेल्या रुग्णांमुळे चिंता वाढत असताना मंगळवारी (ता. ३०) शहरातील दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात ३१ रुग्णांची भर पडली. दरम्यान, कोविड हॉस्पिटलमधील पंधराजणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. 

शहरात मंगळवारी सकाळी सलग दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या पंधरा झाली. तर वाढलेल्या ३१ रुग्णांमुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांचा आकडा ५५४ वर पोचला आहे. मृत्यू झालेले दोन्ही रुग्ण जालना शहरातील असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यातील एक शहरातील मंठा चौफुली परिसरातील ८४ वर्षीय पुरुष असून तो न्यूमोनिया आजाराने त्रस्त होता. ता. २७ जून रोजी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर दुसरा रुग्ण नरीमननगरमधील ५५ वर्षीय पुरुष असून मेंदूतून रक्तस्राव होत असल्याने त्यास ता. २८ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोघांची प्रकृती चिंताजनक होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, डॉ. संजय जगताप यांच्यासह सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला; मात्र या दोन्ही रुग्णांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांचा सकाळी मृत्यू झाला. 

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

जिल्ह्यातील ३१ संशयितांचे मंगळवारी सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आले. यात जालना शहरातील विणकर मोहल्ला येथील सात, हॉटेल अमित परिसरातील तीन, वसुंधरानगरामधील तीन, जुना जालना भागातील संजोगनगरमधील दोन, मस्तगड, भरतनगर, व्यंकटेशनगर, जेपीसी बॅंक कॉलनी, बरवार गल्ली, संभाजीनगर, सतकरनगर, अकेली मशीद, मिशन हॉस्पिटल, मंगल बाजार, नरीमननगर, जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथील प्रत्येकी एक, तर जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील चार रुग्णांचा समावेश आहे. 

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

कोविड हॉस्पिटलमधील बरे झालेल्या पंधरा रुग्णांमध्ये जालना शहरातील मंगळबाजार व संभाजीनगरमधील प्रत्येकी दोन, राज्य राखीव दलातील एक जवान, जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील नऊ व अंबड शहरातील चांगलेनगरमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. सातत्याने रुग्णांची भर पडत असल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ५५४ झाला असून, त्यापैकी ३५१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात १८८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत पंधरा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात २७४ व्यक्तींचे संस्‍थात्‍मक अलगीकरण 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकूण २७४ व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात तीन, मोतीबाग येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात २८, संत रामदास वसतिगृहात ४०, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात ३१, मुलींच्या शासकीय वसतिगृहात १८, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात ३०, परतूर येथील मॉडेल स्कूलमध्ये १६, अंबडमधील शासकीय मुलींच्या वसतिगृहात २० व्यक्ती अलगीकरणात आहेत. बदनापूर येथील शासकीय मुलांच्या वसतिगृहात १५, भोकरदन येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात ३ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये २२, जाफराबाद शहरातील हिंदुस्थान मंगल कार्यालयात १२, टेंभुर्णी येथील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये २० व घनसावंगीतील अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहात १६ व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna