जालन्यात आजवर हजार कोरोनामुक्त

उमेश वाघमारे 
Saturday, 25 July 2020

जालना शहरात तब्बल ९० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  तर शुक्रवारी ६७ जण उपचारानंतर बरे झाले . त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल एक हजार ५२ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जालना -  कोरोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी (ता.२४) जालना शहरात तब्बल ९० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात ता. १४ जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या रॅपीड अँटीजेन टेस्टचे ६३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, तर शुक्रवारी ६७ जण उपचारानंतर बरे झाले . त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल एक हजार ५२ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जालना शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील कोरोनाबाधितांमध्ये भर सुरूच आहे. यात शुक्रवारी (ता. २४) शहरातील ९० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात ता. १४ जुलैपासून शहरातील पाणीवेस, जिल्हा परिषद शाळा, संभाजीनगर, चंदनझिरा, नूतन वसाहत, मूर्तीतलाव, ढोरपुरा, मंठा ग्रामीण रुग्णालय, घनसावंगी ग्रामीण रुग्णालय येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आल्या आहेत. यात ६२१ पैकी ६३ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजघडीला एकूण तब्बल एक हजार ६९६ कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

सध्या जालना येथे ५४६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असून, ४० जणांना उपचारासाठी इतर ठिकाणी रेफर करण्यात आले आहे. तर ५८ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

जालना शहरातील कोरोनाबाधितांपैकी ६७ रुग्ण शुक्रवारी (ता. २४) उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला. यात शहरातील लक्कडकोट येथील १६ जण, अमित हॉटेल परिसरातील १३ जण, कन्हैयानगर येथील दहा जण, मोदीखाना येथील सहा, संभाजीनगर, रामनगर येथील प्रत्येकी चार, नेहरू रोड येथील तीन, कसबा, मस्तगड, पुष्पकनगर येथील प्रत्येकी दोन, पाणीवेस, चंदनझिरा, गोपालपुरा, आरपी रोड, कादराबाद येथील प्रत्येकी एकजण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल एक हजार ५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

जिल्ह्यात ८९२ जण संस्थात्मक अलगीकरणात 

जिल्ह्यात ८९२ जणांचे शुक्रवारी (ता.२४) संस्‍थात्‍मक अलगीकरण करण्यात आले. यामध्ये जालना पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे १०२, मोतीबाग शासकीय मुलींचे वसतिगृह येथे सात, वनप्रशिक्षण केंद्र वसतिगृह येथे १८१, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे ६४, मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह येथे ५६, जेईएस मुलांचे वसतिगृह येथे ६१, जेईएस मुलींचे वसतिगृह येथे २४, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स डी ब्लॉक येथे ६४, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स सी ब्लॉक येथे ११४, राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर्स ए ब्लॉक येथे सहा, परतूर येथील केजीबीव्ही येथे दोन, मंठा येथील मॉडेल स्कूल येथे १५, अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे १२, शासकीय मुलींचे वसतिगृह येथे ४०, बदनापूर येथील शासकीय मुलांचे वसतिगृह येथे २७, घनसावंगी येथील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे सात, भोकरदन येथील शासकीय मुलींचे वसतिगृह येथे तीन, शासकीय मुलांचे वसतिगृह येथे ६०, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे २३, जाफराबाद येथील पंचकृष्णा मंगल कार्यालय येथे १२, हिंदुस्थान मंगल कार्यालय येथे सातजणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report negative in Jalna

Tags
टॉपिकस