जालना जिल्ह्यात लहान मुलेही कोरोनाच्या तावडीत 

महेश गायकवाड
Wednesday, 27 May 2020

मुंबईवरून परतलेल्या कुटुंबामुळे दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा वाढत आहे. यात लहान मुलेही कोरोनाबाधित आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या तीन दिवसांत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये पाच मुलांचा समावेश आहे. यात एकवर्षीय बालकही आहे.

जालना -  मुंबईवरून परतलेल्या कुटुंबामुळे दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा वाढत आहे. यात लहान मुलेही कोरोनाबाधित आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या तीन दिवसांत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये पाच मुलांचा समावेश आहे. यात एकवर्षीय बालकही आहे. दरम्यान, मंगळवारी (ता.२६) पुन्हा सहा व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा ७७ झाला आहे. 

जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. या पाच दिवसांत एकूण ३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत आढळून आलेल्या ७७ रुग्णांपैकी १८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या रुग्णालयात ५९ जणांवर उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

मंगळवारी आढळून आलेल्या सहा रुग्णांमध्ये मुंबईवरून मठपिंपळगाव (ता. अंबड) येथे परतलेल्या कुटुंबातील अकरावर्षीय मुलगी व दहावर्षीय मुलगा, मुंबईवरून वखारी वडगाव (ता. जालना) येथे परतलेल्या दोन महिला व हिवरा काबली (ता. जाफराबाद) येथील एका सात वर्षाच्या मुलासह महिलेचा समावेश आहे. 

हेही वाचा : त्यांच्या’साठी आता जिल्हाच बनलंय कुटुंब...

जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या ७७ रुग्णांमध्ये दोन गर्भवती व एक ते सोळा वर्षांपर्यंतच्या सात मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात शहरातील एका खासगी हॉस्पिटलमधील एका कोरोनाबाधित कर्मचाऱ्याच्या मुलासही संसर्ग झाला आहे. हा इतर सहा मुलांमध्ये अंबड शहरातील एका कुटुंबातील चारवर्षीय मुलगा, नूतनवाडी (ता. जालना) येथे मुंबईवरून परतलेले अकरावर्षीय भाऊ व सोळावर्षीय बहीण, मुंबईवरून मठपिंपळगाव (ता. अंबड) येथे परतलेल्या कुटुंबातील अकरावर्षीय मुलगी व दहावर्षीय मुलगा व मुंबईवरून हिवराकाबली (ता. जाफराबाद) येथील एका सात वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण रुग्ण 

 • ६ एप्रिल : दुखीनगरमधील ६५ वर्षीय कोरोनाबाधित महिला बाधित 
 • २१ एप्रिल : शिरोडा (ता. परतूर) येथील महिला 
 • १ मे : पारध (ता. भोकरदन) येथील सतरावर्षीय युवती 
 • २ मे : परतूर तालुक्यात मुंबईहून आलेला युवक. 
 • २ मे : मालेगावच्या बंदोबस्तावरून परतलेले चार जवान. 
 • १० मे : कानडगाव येथे (ता. अंबड) मुंबईवरून आलेले दोघे. 
 • १० मे : इंदेवाडी परिसरातील गर्भवती. 
 • ११ मे : जिल्हा रुग्णालयातील एक परिचारिका 
 • ११ मे : राज्य राखीव दलातील एक जवान 
 • १२ मे : राज्य राखीव दलातील एक जवान 
 • १३ मे : मुंबईहून रामनगरकडे परतणारा युवक, राज्य राखीव दलातील एक जवान व परतूर येथील एक व्यक्ती. 
 • १४ मे : कोविड हॉस्पिटलमधील महिला डॉक्टर. 
 • १५ मे : खासगी हॉस्पिटलचा डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी व पेवा (ता. मंठा) येथे मुंबईहून आलेली महिला व राज्य राखीव दलातील चार जवान. 
 • १७ मे : खासगी हॉस्पिटलमधील दोन कर्मचारी, घनसावंगीतील पीरगॅबवाडी येथील सहा व रांजणी येथील एक, अंबड येथील कानडगाव येथील एक. 
 • १८ मे : नूतनवाडी येथील अकरावर्षीय मुलगा. 
 • १९ मे : जालना शहरातील खासगी हॉस्पिटलमधील चार कर्मचारी व अंबड तालुक्यातील शिरनेर येथे मुंबईवरून परतलेला एक व्यक्ती. 
 • २० मे : मुंबईवरून अंबड तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगावात परतलेल्या एका कुटुंबातील तिघे पॉझिटिव्ह 
 • २२ मे : जुना जालना भागातील हॉस्पिटलमधील चार, तर नवीन जालना परिसरातील हॉस्पिटलमधील एक कर्मचारी, पेवा (ता. मंठा) येथील एक, राज्य राखीव दलातील एक जवान व टेंभुर्णी (ता. जाफराबाद) येथे मुंबईवरून परतलेली एक महिला. 
 • २३ मे : जुना जालना भागातील एका खासगी हॉस्पिटलमधील एक कर्मचारी व मुंबईवरून हिवरा काबली (ता. जाफराबाद) येथे आलेला एक व्यक्ती. 
 • २४ मे : अंबड शहरातील एकाच कुटुंबातील ४ पॉझिटिव्ह. यात चार वर्षांच्या मुलाचा समावेश. नवीन जालना भागातील खासगी हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी, पुष्पकनगरमधील एक व निरखेड येथील एक. 
 • २५ मे : जुना जालना भागातील एका खासगी हॉस्पिटलमधील चार कर्मचारी व एका वर्षाचा मुलगा, नूतनवाडी येथील २, अंबड तालुक्यातील शिरनेर येथील १, मंठा तालुक्यातील हनुमंतखेडा आणि कानडी येथील प्रत्येकी एक. 
 • २६ मे : मुंबईवरून मठपिंपळगाव (ता. अंबड) येथे परतलेल्या कुटुंबातील अकरावर्षीय मुलगी व दहावर्षीय मुलगा, मुंबईवरून वखारी वडगाव (ता. जालना) येथे परतलेल्या दोन महिला व हिवरा काबली (ता. जाफराबाद) येथील एका सात वर्षांचा मुलगा व महिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona report positive in Jalna